पथदिवे बंद : पुलावर दाट काळोख, रस्त्यांवर कुत्र्यांचा हैदोस

जुनीवस्तीपासून 200 मीटरचा म्हणजे मृत्युची वाट

-गुन्हेगारी कृत्यांना मिळू शकतो वाव
-प्रशासन अजूनही गाढ झोपेत
बडनेरा / 12 सप्टेंबर : अमरावती-बडनेरा रोडवरील नरखेड रेल्वे क्रॉसिंगवर असलेला उड्डाणपूल आणि त्याला लागून असलेला अलमास गेट-जुनी वस्ती परिसरापर्यंतचा 200 मीटरचा रस्ता हा नागरिकांसाठी अक्षरशः भीषण संकट बनला आहे. उड्डाणपुलावरील पथदिवे गेल्या दहा-बारा दिवसांपासून बंद असल्याने रात्री हा पूल दाट काळोखात बुडतो. दुसरीकडे, दिवसभर, 24 तास संपूर्ण मार्गावर कुत्र्यांचे थवे आणि मोकाट जनावरांचा वावर असतो. यामुळे या भागातून जाणार्‍या प्रवाशांचा प्रत्येक प्रवास ही जीवघेणी तारेवरची कसरत ठरतो आहे.
रात्री उड्डाणपूल अंधाराने गिळला की नागरिकांचा प्रवास भीतीदायक होतो. फक्त गाड्यांच्या हेडलाईट्सवर विसंबून लोकांना पुल पार करावा लागतो. समोरून अचानक कुत्रे किंवा जनावरे धावून आली तर अपघात होण्याची खात्रीच. या परिस्थितीत अशा दाट काळोखाचा गैरफायदा गुन्हेगार सहज घेऊ शकतात. चेन स्नॅचिंग, दारू पिणार्‍यांचे थवे, संशयास्पद हालचाली हे सगळं इथे कधीही सुरू होऊ शकतं. हा अंधार म्हणजे संभाव्य गुन्ह्यांना मोकळी दारं उघडतो आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
या परिसरात उपद्रव केवळ रात्रीच्या अंधारापुरता मर्यादित नाही. दिवसभरच कुत्र्यांचे थवे रस्त्यावर बसलेले, समोर धावत जाणारे, वाहनांच्या मागे लागणारे असे प्रकार कायम होत असतात. शाळकरी मुलं, वृद्ध किंवा महिला यांना यातून जीवघेणा त्रास सहन करावा लागतो. उड्डाणपुलाच्या टोकापासून अलमास गेट-जुनी वस्तीपर्यंतचा जवळपास 200 मीटर रस्ता दिव्यांनी उजळलेला आहे. मात्र हा उजेड सुरक्षिततेचं आश्वासन देऊ शकत नाही. कारण या रस्त्यावर भटकी जनावरे जवळजवळ दिवसभर वावरतात. रस्त्याच्या मध्यभागी सरळ उभ्या राहिलेल्या जनावरांमुळे वाहनचालकांना ब्रेक मारावे लागतात आणि अपघात ओढावतात.
काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे अचानक कुत्र्यांच्या समोर धावल्यामुळे एका दांपत्याची दुचाकी थांबली. मागून येणारे मालवाहू वाहन दुचाकीला बचावण्याच्या प्रयत्नात उलटले. वाहनाचा सारा शेतमाल रस्त्यावर विखुरला. लाखोंचे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली. पण त्या प्रसंगानेच संकट किती भीषण आहे हे स्पष्ट झालं. जीव गमावल्यावरच प्रशासन हलणार का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करित आहेत.
उड्डाणपूलावरचा दाट काळोख, कुत्र्यांचा दिवसभरचा उपद्रव आणि मोकाट जनावरांचा विळखा यामुळे हा संपूर्ण परिसर मृत्यूचं सावट बनला आहे. नागरिक आता थेट इशारा देत आहेत, तात्काळ पथदिवे सुरू करा, कुत्र्यांचा व मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा, अन्यथा एखाद्या भीषण अपघातानंतर वा गुन्ह्यानंतर झालेल्या जीवितहानीला केवळ महानगरपालिकेच जबाबदार धरलं जाईल.
-प्रशासन गाढ झोपेत
महानगरपालिकेने पूर्वी मोठ्या थाटामाटाने मोकाट जनावरं व कुत्र्यांवर कारवाईसाठी हेल्पलाईन नंबर जाहीर केले होते. पण प्रत्यक्षात रोजचं संकट डोळ्यापुढे असूनही अधिकारी मुकाट्याने दुर्लक्ष करतात. पथदिवे सुरू करणे यासारखी मूलभूत जबाबदारीही पार पडलेली नाही. नागरिक म्हणतात, अंधार, कुत्रे आणि जनावरे, हे तिहेरी संकट आम्ही सहन करत आहोत, मात्र प्रशासन आंधळं-बहिरं बनलंय.

 

संबंधित बातम्या

Back to top button