वादळी पावसात 933.34 हेक्टरवरील पीके नष्ट
जूनच्या 15 दिवसांत 94 गावांना फटका

-मदतीसाठी 47.5 कोटी रुपयांचा प्रस्ताव
अमरावती / 18 जून: अमरावती जिल्ह्यात एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठे नूकसान केले. त्यानंतर जून महिन्यातही जिल्ह्याला मुसळधार वादळी पावसाने झोेडपून काढले. पहिल्या 15 दिवसांत झालेल्या पावसाचा 94 गावांना फटका बसला. या गावांतील 933.43 हेक्टर शेतजमीनीवरील पीके नष्ट झाली आहेत. त्यात फळ पिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. एप्रिल व मे महिन्यातील पावसाने बाधित शेतकर्यांच्या मदतीसाठी 47.5 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला असून जूनच्या पहिल्या 15 दिवसांत झालेल्या नूकसानीचे पंचनामे वेगाने करण्यात येत आहेेत.
जिल्ह्याचे माहे जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान 145.7 मिमी असून 16 जून 2025 पर्यंत प्रत्यक्षात 44.4 मिमी पाऊस झाला आहे. पावसाची टक्केवारी 30.5 टक्के आहे. जिल्ह्यात एप्रिल व मे 2025 या कालावधित नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती, फळ पिकांच्या नुकसानीसाठी 47.05 कोटी रुपये शासनाकडे मागणी करण्यात आलेली आहे. माहे जून महिण्यात 1 ते 15 जून या कालावधीत वादळी वार्यामुळे जिल्ह्यातील 94 गावातील 933.43 हेक्टर क्षेत्रावर शेती पिके, फ़ळपिकाचे नुकसानीबाबत तालुका कृषि अधिकारी अंजनगाव, धारणी, चांदूरबाजार, चिखलदरा, मोर्शी व दर्यापूर यांनी प्राथमिक अहवाल सादर केलेला असून या बाधित क्षेत्राचे पंचनामे सुरु आहेत, असे प्रशासनाने कळविले आहे.
जिल्ह्याचे सर्व साधारण क्षेत्र 12.21 लाख हेक्टर असून लागवडी लायक क्षेत्र 7.81 लाख हेक्टर एवढे आहे. खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र 6.91 लाख व रब्बी पिकाचे सरासरी क्षेत्र 1.47 लाख हेक्टर आहे. जिल्ह्यातील खरीपाची मुख्य पिके सोयाबिन, कापूस, तूर असून रब्बीतील मुख्य पिके हरबरा व गहू आहेत. जिल्ह्यातील एकूण तालुक्यांची संख्या 14, एकूण गावांची संख्या 2016 असून 2021 च्या कृषि गणनेनुसार एकूण शेतकरी संख्या 4 लाख 56 हजार 360 आहे. त्यापैकी 1 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकर्यांची संख्या 36 टक्के, 1 ते 2 हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकर्यांची संख्या 43 टक्के, 2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या शेतकर्यांची संख्या 21 टक्के आहे. जिल्ह्यातील सरासरी जमिन धारणा 1.64 हेक्टर आहे.
-पंचनामे तात्काळ पूर्ण करा : पालकमंत्री
नवीन खरिप हंगाम सुरु झाला आहे. पेरणीपूर्वी कोणतीही अडचण येउ नये यासाठी शेतकर्यांना सर्वतोपरी मदत उपलब्ध करुन देण्याचे शासनाचे धोरण आहे. नूकसानग्रस्त शेतकर्यांना आर्थिक मदत देण्यात विलंब होउ नये, याकरिता जून महिन्यात वादळी पावसामुळे बाधित क्षेत्राचे त्वरित पंचनामे करावे आणि तात्काळ अहवाल सादर करण्यात यावा, असे निर्देश अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कृषी व महसूल विभागाला दिले आहे.




