दोन अल्पवयीन मुलांशी एसटी चालकाचे अनैतिक कृत्य

वरुड शहर हादरले

-आरोपीस 10 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी
-नागरिकांमध्ये संताप व चर्चेला ऊत
वरुड / 8 सप्टेंबर : शहरातील एस.टी. चालकाने दोन अल्पवयीन बालकांना फुस लावून सुनसान जागी नेऊन केलेल्या घृणास्पद कृत्याने वरुड शहर हादरले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चालक देवराव तुळशिराम बावणे (वय 57, रा. अष्टविनायक सभागृह परिसर, वरुड) याला अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 10 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
भवानी चौक, राजुरा नाका परिसरातील दोन अल्पवयीन मुलांना, ज्यांपैकी एक 10 वर्षांचा असून दुसरा 7 वर्षांचाच आहे, आरोपी बावणे याने 6 सप्टेंबर रोजी पोळ्याच्या दिवशी दुचाकीवर बसवून नेले. तो त्यांना रेल्वे स्टेशन परिसरातील विठ्ठल नगर या सुनसान भागात घेऊन गेला आणि तेथे अनैसर्गिक कृत्य केल्याचा आरोप आहे. या घटनेची माहिती 10 वर्षीय बालकाच्या वडिलांना मिळाली. संतापलेल्या पालकांनी आरोपीला पकडून चोप दिल्यानंतर ही बाब उघडकीस आली. तात्काळ पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खांडेकर स्वतः पोलिस ठाण्यात दाखल झाले आणि तपासाची सूत्रे हाती घेतली. पोलिसांनी बावणे याला अटक करून भारतीय दंड संहितेच्या कलम 351, तसेच बालकांचे लैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा 2012, आणि अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा 1989 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीस स्थानिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने 10 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
या घटनेने वरुड शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. स्थानिक एस.टी. आगारातील अधिकारी व कर्मचारीदेखील या धक्कादायक प्रकरणानंतर पोलिस ठाण्यात उपस्थित राहिले. आरोपीसोबत इतर कुणाचा सहभाग आहे काय, याची पोलीस कसून चौकशी करीत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button