भाजपच्या विदर्भातील प्रशिक्षण वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कार्यकर्त्यांच्या फौजेला मिळणार विजयाची नवी शिदोरी

* दीनदयाळ उपाध्याय महाप्रशिक्षण अभियानाचा थाटात शुभारंभ

अमरावती /10 मार्च – भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय महाप्रशिक्षण अभियानाचा विदर्भातील शंखनाद अमरावतीच्या भूमीत मोठ्या उत्साहात झाला. आगामी काळातील आव्हाने पेलण्यासाठी आणि पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी पश्चिम विदर्भातील 500 हून अधिक निवडक कार्यकर्त्यांची फौज या प्रशिक्षण वर्गासाठी एकवटली आहे. राजकारणातील अभ्यासू मांडणी आणि संघटनात्मक बांधणीचा हा मेळावा कार्यकर्त्यांसाठी विचारांची नवी ऊर्जा देणारा ठरणार आहे.
या विशेष सोहळ्याला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासोबतच व्यासपीठावर या अभियानाचे मुख्य संयोजक राजेश पांडे आणि सहसंयोजक धम्मपाल मेश्राम यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर संजय कुटे आणि डॉक्टर उपेंद्र कोठेकर यांनी संघटनेच्या ध्येयधोरणांवर प्रकाश टाकला. याप्रसंगी माजी खासदार रामदास तडस, माजी मंत्री तथा प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण पोटे पाटील यांचीही उपस्थिती लक्षणीय होती. शहराचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे, रविराज देशमुख आणि प्रभुदास भिलावेकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. पश्चिम विदर्भाच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या कार्यकर्त्यांमुळे या शिबिराला एका मोठ्या उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले असून, अमरावती शहर जिल्हा भाजपच्या वतीने पाहुण्यांचा जंगी सत्कार करण्यात आला. भाजपच्या गोटातून मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन दिवसांचे सत्र कार्यकर्त्यांना वैचारिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button