बडनेरा रोडवर भरधाव कारची दुचाकीला भीषण धडक
पिता-पुत्रीचा मृत्यू, एक मुलगी गंभीर

* मद्यधुंद कार चालकाने केले आत्मसमर्पण
* जुन्या बायपास रोडवरील आनंद मार्बलसमोर दुर्घटना
अमरावती / 16 मार्च – शहरात रविवारी (15 मार्च) मध्यरात्री 12:05 च्या सुमारास एक हृदयद्रावक रस्ते अपघात घडला. जुन्या बायपास रोडवरील आनंद मार्बल फॅक्टरीसमोर एका भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील पिता आणि त्यांच्या एका मुलीचा मृत्यू झाला, तर दुसरी मुलगी मृत्यूशी झुंज देत आहे. मायानगर (माउली गार्डन परिसर) येथील रहिवासी गजानन श्रीराम माकोडे (55) हे आपली मुलगी सपना (24) हिला पुणे येथे जाणार्या ट्रॅव्हल्सवर सोडण्यासाठी बडनेरा हायवेकडे जात होते. त्यांच्यासोबत दुसरी मुलगी प्रियंका (23) ही देखील बहिणीला निरोप देण्यासाठी दुचाकीवर (क्र.एमएच-27/-एटी-9030) बसली होती. दरम्यान, पाठीमागून येणार्या भरधाव कारने (क्र. सीजी-04/एनव्ही-7005) त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, तिघेही 50 ते 60 फुटांपर्यंत फरफटत गेले. घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान सपना माकोडे आणि गजानन माकोडे यांचा मृत्यू झाला. प्रियंकाची प्रकृती चिंताजनक असून तिला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
कारमध्ये सापडल्या दारूच्या बाटल्या-प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधील युवक पूर्णपणे नशेत होते. अपघातानंतर कारमधून मद्य आणि बिअरच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून मद्यधुंद चालकांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.अपघातानंतर कार चालक मनीष विरुलमल शोभाानी (35, रा. कृष्णानगर) आणि त्याचा साथीदार पसार झाले होते. मात्र, सोमवारी पहाटे 4:30 च्या सुमारास मनीषने राजापेठ पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. त्याने पोलिसांना सांगितले की, तो बहिणीला आणण्यासाठी रेल्वे स्टेशनला जात होता, तेव्हा हा अपघात घडला. अपघातानंतर घाबरून तो पंचवटी परिसरात गेला आणि तिथे पुन्हा मद्यपान केले. नशा उतरल्यानंतर गुन्ह्याची जाणीव झाल्याने त्याने पोलिसांसमोर शरणागती पत्करली. पोलीस सध्या त्याच्या दुसर्या साथीदाराचा शोध घेत आहेत.




