महामार्गावर भरधाव कारची धडक, कठडे उद्ध्वस्त
आयआरबी कंपनीच्या साहित्याचे नुकसान

-सुदैवाने जीवितहानी टळली
तिवसा / 27 ऑगस्ट : अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास एक भरधाव कार कठड्यावर जाऊन धडकल्याची घटना घडली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी महामार्गावरील कठडे तुटून आयआरबी कंपनीच्या साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.
एमएच-14 ईयु 7554 क्रमांकाची फियाट कंपनीची कार गावकरी हॉटेलजवळील कठड्यावर आदळली. धडक बसल्याचा मोठा आवाज झाल्याने नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. कार इतक्या वेगात होती की कठडे तोडून थेट सर्व्हिस रोडवर पोहोचली. अपघातानंतर कार कठड्यात अडकली होती. नागरिकांनी प्रयत्न करूनही ती बाहेर काढता आली नाही. अखेर दीड तासाने क्रेनच्या मदतीने कार बाहेर काढण्यात आली.
घटनास्थळी आयआरबी कंपनीचे कर्मचारी व तिवसा पोलिस दाखल झाले होते. मात्र, कारचालकाविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, याबाबत नागरिकांत चर्चाही रंगली. या संदर्भात आयआरबी कंपनीचे अभियंता प्रवीण नागपुरे म्हणाले की, महामार्गावर कुठलाही अपघात घडला की आम्ही स्थानिक पोलिसांना माहिती देतो. काल झालेल्या घटनेबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. संबंधित कारमालकाविरुद्ध जी कायदेशीर कारवाई करता येईल ती निश्चित केली जाईल.




