दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन

सोमवारी एकाच दिवशी 23 स्पेशल गाड्या

अमरावती /26 ऑक्टोबर – यंदाच्या दिवाळीच्या पर्वाचा समारोप होत असला तरी छठपूजेचा उत्सव असल्याने विविध प्रांतातील रहिवाशांची ये-जा मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवरील आणि रेल्वे गाड्यांवरील गर्दी कमी होण्याऐवजी वाढतच आहे. ही वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने महाराष्ट्रातील विविध स्थानकांवरून सोमवारी, 28 ऑक्टोबरला एकाच दिवशी 23 स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीचा सण आटोपून आपल्या गावाला किंवा रोजगाराच्या ठिकाणी परतणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे, त्यात छठपूजेसाठी निघालेल्या भाविकांचीही भर पडली आहे. परिणामी जवळपास प्रत्येक रेल्वे गाडीत आणि स्थानकावर पाय ठेवायलाही जागा उरलेली नाही. प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे अनेकांचा प्रवास गैरसोयीचा होत असून, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हे लक्षात घेऊन मध्य रेल्वेने राज्यातील विविध मार्गांवर 23 विशेष गाड्या चालविण्याचे जाहीर केले आहे.

या विशेष गाड्यांमध्ये नागपूरहून पुणे आणि मुंबईला जाणाऱ्या तसेच तिकडून परत येणाऱ्या चार स्पेशल ट्रेनचाही समावेश आहे. त्यापैकी ट्रेन क्रमांक 01410 नागपूर–पुणे विशेष ट्रेन सोमवारी, 28 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजून 10 मिनिटांनी नागपूर स्थानकावरून सुटणार आहे. ही गाडी वर्धा, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर आणि दौंड कॉर्ड लाइन या स्थानकांवर थांबणार आहे. गाडीला एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, अकरा शयनयान, सात सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणी कोचसह गार्ड ब्रेक व्हॅन जोडलेली आहे.

तसेच ट्रेन क्रमांक 01012 नागपूर–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष ट्रेन सोमवारी रात्री 10 वाजून 10 मिनिटांनी नागपूर स्थानकावरून सुटणार आहे. ही गाडी वर्धा, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, ठाणे आणि दादर स्थानकांवर थांबणार आहे. या गाडीमध्ये दोन वातानुकूलित द्वितीय श्रेणी, एक वातानुकूलित तृतीय श्रेणी, बारा शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणी कोचसह गार्ड ब्रेक व्हॅनचा समावेश आहे.

संबंधित बातम्या

Back to top button