जिल्ह्यात 6.44 लाख हेक्टरवरील पेरण्या पूर्ण

तीन तालुक्यांत शंभर टक्के पेरणी

-दमदार पावसामुळे शेतकरी उल्हासित
-केवळ सहा टक्के पेरण्या रखडल्या
अमरावती / 13 जुलै: जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून अमरावती जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाने हजेरी लावल्यानंतर उल्हासित झालेल्या शेतकर्‍यांनी पेरणीच्या कामांना गती दिली होती. सध्या जिल्ह्यात 6 लाख 44 हजार हेक्टर शेत जमीनीवरील पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत. कृषी विभागाने केलेल्या नियोजनानुसार हे प्रमाण 94.30 टक्के एवढे आहे. जिल्ह्यात आता केवळ 6 टक्के पेरण्या रखडल्या असून सततधार पावसाचा अडथळा त्यासाठी कारणीभतू आहे.
अमरावती जिल्ह्यातील धारणी, चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर या तालुक्यांत तर 100 टक्के पेरण्या पूर्ण झाल्यात. कपाशी व सोयाबिनसोबतच तुर या पारंपारिक पिकांच्या लागवडीकडे यंदाही शेतकर्‍यांचा मोठ्या प्रमाणात कल आहे. सोबतच काही प्रमाणात खरिपाची अन्य पिके घेण्यासाठीही शेतकर्‍यांनी नियोजन केल्याचे दिसून येते. अमरावती जिल्ह्यात यंदा खरिप हंगामासाठी कृषी विभागाने 6 लाख 82 हजार 982 हेक्टर शेत जमीनीवर पिकांचे नियोजन केले आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीलाच मान्सूनने जिल्ह्यात जोरदार सलामी दिली होती. त्यामुळे शेतकर्‍यांनीही उत्साहाने पेरणीची तयारी पूर्ण केली. जून महिन्याच्या मध्यापर्यंत सर्व 14 तालुके मिळून 50 टक्क्यांपर्यंत पेरण्यांची कामे पूर्ण झाली होती. मात्र मध्येच पावसाने दडी मारली आणि पेरण्या रखडल्या होत्या. बरचे दिवस पावसाने उसंत घेतल्याने ज्या शेतकर्‍यांनी पेरण्या केल्यात त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढावते की काय? अशी भीतीही निर्माण झाली होती. मात्र जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यात सर्वत्र पावसाचे दमदार आगमन झाले आणि शेतकर्‍यांनी सुटकेचा निश्वास टाकला.
पेरणीसाठी अनूकूल पाउस पडल्याने शेतकर्‍यांनी पून्हा पेरणीच्या कामांना वेग दिला. आतापर्यंत 14 तालुक्यांमध्ये 6 लाख 44 हजार हेक्टर शेतजमीनीवरील पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत. हे प्रमाण 94.30 टक्के एवढे आहे. गत रविवारपासून चार दिवस जिल्ह्यात सततधार पाउस कोसळला. गुरुवारपासून पावसाने उसंत दिली. काही भागात शेतजमीनीत अद्यापही ओल कायम असल्याने शेतकर्‍यांना पेरणीच्या कामात अडथळे आले. त्यामुळे जवळपास 6 टक्के शेतांतील पेरण्या रखडल्या आहेत. येत्या काही दिवसांत येथील पेरणीची कामेही पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत झालेल्या लागवडीमध्ये धारणी तालुका जिल्ह्यात अव्वल आहे. त्यापाठोपाठ नांदगाव खंडेश्वर आणि चांदुर रेल्वे तालुक्यातील पेरणीही 99 टक्क्यांवर पोहोचली आहे.
-धारणीत 280 हेक्टरवर उसाची लागवड
एकेकाळी अमरावती जिल्ह्यातही उसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जायची. कालांतराने येथील साखर कारखाने बंद पडले आणि उसाची मागणी घटली. त्यासोबतच उसाच्या पिकाकडेही शेतकर्‍यांनी पाठ फिरविली आहे. आता जिल्ह्यात केवळ धारणी तालुक्यात उसाचे नाममात्र पीक घेतले जाते. यंदा धारणी तालुक्यात 280 हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे.
-सर्वाधिक लागवड सोयाबिनची
यंदाही सोयाबिन, कपाशी आणि तुर ही पारंपारिक पिके घेण्याकडे जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा कल आहे. मात्र सर्वाधिक लागवड सोयाबिनची झाली आहे. आतापर्यंत 2.38 लाख हेक्टरवर शेतकर्‍यांनी सोयाबीनची पेरणी केली आहे. त्याखालोखाल 2 लाख 28 हजार 920 हेक्टरवर कपाशी तर 1 लाख 11 हजार 292 हेक्टरवर तुरीची लागवड झाली आहे. सोबत अन्य पिकांचीही अगदीच थोड्या प्रमाणात शेतकर्‍यांनी पेरणी केली असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button