दक्षिण भारत यात्रा; इस्कॉन परंपरेनुसार संकीर्तन, नामजप व आध्यात्मिक कार्यक्रम

इस्कॉन अमरावतीकडून भव्य आध्यात्मिक यात्रेचे आयोजन

* पवित्र दिव्य स्थळांचे सखोल दर्शन

* वयोगटातील भक्तांसाठी सोयीस्कर व सुयोग्य नियोजन

अमरावती /15 डिसेंबर : श्री रुक्मिणी-द्वारकाधीश आध्यात्मिक संस्कार केंद्र (इस्कॉन), राठी नगर, अमरावती यांच्या वतीने दक्षिण भारत यात्रा – 2026 या नावाने एक भव्य आणि पवित्र अध्यात्मिक यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा 19 फेब्रुवारी 2026 ते 1 मार्च 2026 या कालावधीत पार पडणार असून, भक्तांना दक्षिण भारतातील वैदिक परंपरा, समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि प्राचीन मंदिरांचे दिव्य दर्शन अनुभवण्याची संधी मिळणार आहे. इस्कॉन अमरावती दरवर्षी विविध तीर्थक्षेत्रांना भक्तीमय यात्रांचे आयोजन करते. त्याच परंपरेतून या वर्षीची ही दक्षिण भारत यात्रा भक्तांना आत्मिक समाधान, अध्यात्मिक चिंतन आणि हरिनाम संकीर्तनाचा अद्वितीय अनुभव देण्यासाठी खास नियोजित केली आहे.
यात्रेमध्ये तिरुमला-तिरुपतीचे श्री वेंकटेश्वर भगवान मंदिर, येल्लोर, कांचीपुरमचे शक्तिपीठ, श्रीरंगमचे अद्वैत परंपरेशी निगडित विशाल श्रीरंगनाथ मंदिर, मदुराईचे मीनाक्षी अम्बा मंदिर, रामेश्वरमचे ज्योतिर्लिंग, कन्याकुमारीचा समुद्रसंगम व देवी मंदिर तसेच थिरुअनंतपुरमचे श्री पद्मनाभस्वामी मंदिर अशा अनेक पवित्र स्थळांचा समावेश आहे. या सर्व देवस्थानांना भेट देताना भक्तांना इस्कॉनच्या परंपरेनुसार संकीर्तन, नामजप आणि आध्यात्मिक वातावरणाचा लाभ मिळणार आहे. यात्रेतील सोयी-सुविधांचा विचार करता 3 एसी ट्रेन तिकिटे, एसी हॉटेलमधील आरामदायी निवास, एसी ट्रॅव्हल्सद्वारे स्थानिक प्रवास तसेच हर्बल टीसह सात्त्विक प्रसादम नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण अशा सर्व सुविधा यात्रेकरूंना प्रदान केल्या जाणार आहेत. प्रत्येक ठिकाणी स्वच्छता, सुरक्षितता आणि आध्यात्मिक वातावरण राखण्यास विशेष लक्ष देण्यात येत आहे. भक्तांना अखंड प्रभुस्मरण आणि साधनेचा अनुभव मिळावा, यासाठी प्रवासाचे संपूर्ण नियोजन अत्यंत बारकाईने केले आहे. ही यात्रा भक्तांसाठी केवळ पर्यटन न राहता, एक मौल्यवान अध्यात्मिक साधना, आत्मिक समाधान आणि परमेश्वराच्या चरणी भक्तीभाव दृढ करण्याचे साधन ठरेल, असा आयोजकांचा विश्वास असून, इच्छुक भक्तांनी वेळेत नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे. यात्रेसंबंधी अधिक माहितीसाठी श्री गोविंद दास (9404884301), श्री सचीप्राण दास (9689427076) आणि श्री मुरारी चैतन्य दास (7972818132) यांच्याशी संपर्क साधावा.

संबंधित बातम्या

Back to top button