सोनापूर जंगलात मेंढपाळावर जीवघेणा हल्ला!
लाठ्या-काठ्यांनी हात मोडला

-आरोपी अद्यापही मोकाट
अचलपूर / 29 जुलै : तालुक्यातील सोनापूर जंगल परिसरात मेंढ्या चारण्यासाठी गेलेल्या 35 वर्षीय इसमावर लाठी-काठ्यांनी जबरदस्त हल्ला करून हात फोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मोती राम मदने (रा. अचलपूर) यांच्यावर हा हल्ला 26 जुलै रोजी दुपारी झाला असून, आरोपी आनंद गाठे याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, हल्ल्यानंतर तीन दिवस उलटले तरी आरोपीला अटक न झाल्याने जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
26 जुलै रोजी दुपारी 3 ते 3.20 च्या दरम्यान मोती राम मदने हे आपल्या नेहमीच्या दिनचर्येनुसार सोनापूर जंगल परिसरात मेंढ्या चारण्यासाठी गेले होते. याचवेळी आनंद गाठे नामक व्यक्तीने कोणताही वाद न होता थेट त्यांच्या दिशेने धाव घेत लाठ्या व काठ्यांनी अमानुष मारहाण केली. या अचानक झालेल्या हल्ल्यात मदने यांचा हात मोडला गेला असून, ते गंभीर जखमी अवस्थेत अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढे त्यांची प्रकृती चिंताजनक पाहता त्यांना परतवाडा येथील ट्रामा केअर युनिटमध्ये हलविण्यात आले आहे.
मोती मदने यांच्या तक्रारीवरून पथ्रोट पोलीस ठाण्यात आनंद गाठे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हल्ल्याला तीन दिवस उलटूनही आरोपी आनंद गाठे याला अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांची ही ढिसाळ कार्यपद्धती पाहता, स्थानिक नागरिक व पीडित कुटुंबीयांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. अशा गंभीर गुन्ह्यानंतरही पोलिसांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई न केल्याने कायदा व सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभे राहते, अशी टीका नागरिकांनी केली आहे.




