खावटीच्या वादातून मुलानेच केली वडिलांची हत्या

चांदूर बाजारच्या पिंपरी पूर्णा येथील घटना

-आरोपीला अटक, पोलिस तपास सुरु
चांदूर बाजार / 12 सप्टेंबर : चांदूर बाजार पोलिस स्टेशन क्षेत्रातील पिंपरी पूर्णा गावात शनिवारी, 12 सप्टेंबर रोजी एका अत्यंत दुर्दैवी घटनेत 75 वर्षीय माणिक यशवंतराव सोसे यांचा मृत्यू झाला. मृतकाचा मोठा मुलगा गोपाल माणिक सोसे (42) यांच्या सांगण्यानुसार, लहान मुलगा महेश माणिक सोसे (38) याने कौटुंबिक वादातून वडिलांच्या डोक्यावर रोल पाइपने प्रचंड मारहाण करून त्यांची हत्या केली.
पिंपरी पूर्णा येथील या कौटुंबिक वादाचे मूळ कारण खावटी रक्कमेवरून सुरू झाले. वडिलांनी आपल्या दोन्ही मुलांवर पालन-पोषणासाठी न्यायालयात खावटीची रक्कम भरण्यास सांगितली होती. न्यायालयाने दोन्ही मुलांवर अ‍ॅरेस्ट वारंट जारी केले होते, त्यानुसार गोपाल व महेश यांना एकूण 12,500 रुपये भरणे आवश्यक होते. गोपाल आणि महेश यांनी एकत्रितपणे रक्कम भरण्याचे प्रयत्न केले, मात्र महेश या प्रक्रियेत त्रस्त झाला आणि रागातून ही हृदयद्रावक घटना त्याने घडवून आणली.
महेश माणिक सोसेला सुरुवातीपासून मद्यपानाची सवय होती आणि काही महिन्यांपूर्वीच त्याची पत्नीही त्याला सोडून गेली होती. घरातील आर्थिक ताण आणि कौटुंबिक दबावामुळे महेशचा मानसिक त्रास वाढला होता, जो अखेरीस वडिलांवर हिंसक हल्ल्यात रूपांतरित झाला. घटना घडल्यावर चांदूरबाजार पोलिसांनी तातडीने महेशला अटकेत घेतले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. ठाणेदार अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली भूषण वैसाने, विष्णु पांडे, पूजा माळी, विनोद इंगले, अमोल सानप, रोशन चव्हाण, संकेत चोरे आणि नरेंद्र मूलतकर तपास करत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button