माहुली जहांगीर येथील सौर उर्जा प्रकल्प कार्यान्वित
5 मेगावॅट क्षमता, 2200 शेतकर्यांना लाभ

* कृषी पंपाला दिवसा वीज पूरवठा
अमरावती / 1 जुलै: अमरावती जिल्ह्यातील माहुली जहागीर येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतील 5 मेगावॅट क्षमता असलेला नविन सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील 2 हजार 200 शेतकर्यांना दिवसा विजेची सोय झाली आहे. या योजनेत सुर झालेले जिल्ह्यातील हे तीसरे सौर प्रकल्प असून याअगोदर उसळगव्हाण (देवगाव उपकेंद्र) आणि जळगाव मंगरूळ (मंगरूळ दस्तगीर उपकेंद्र) हे 6 मेगावॅट क्षमतेचे दोन सौर प्रकल्प सुरू झाले आहे. शेतकर्यांना शोशत आणि दिवसा वीज देण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना 2.0 राबविण्यात येत असून राज्यात या योजनेला महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकश चंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विदर्भात प्रादेशिक संचालक परेश भागवत यांच्या मार्गदर्शनात गती देण्यात आली आहे. विकेंद्रीत स्वरूपाचे सौर प्रकल्प उभारायचे आणि त्या प्रकल्पाच्या माध्यनातून निर्मिती होणारी वीज महावितरणच्या 33 केव्ही उपकेंद्राला जोडून त्या माध्यमातून त्या उपकेंद्रातून वीज पुरवठा होणार्या शेतकर्यांना दिवसा वीज देणे असे या योजनेचे स्वरूप आहे. जिल्ह्यात या योजनेअंतर्गत महावितरणच्या 41 उपकेंद्रासाठी 44 ठिकाणी सौर प्रकल्प उभारण्यात येत असून या माध्यमातून 184 मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येणार आहे. माहुली जहागीर सौर प्रकल्पाची क्षमता 5 मेगावॅट असून 25 एकर शासकीय जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. मे.व्ही.व्ही.के.आर फोटोव्होलटाईस एनर्जी या विकासकामार्फत उभारण्यात आलेल्या या सौर प्रकल्पातून निर्मिती होणारी वीज 33 केव्ही माहुली जहागीर उपकेंद्राच्या माध्यमातून परिसरातील 2 हजार 200 शेतकर्यांना दिवसा देण्यात येणार आहे. जिल्ह्यात या प्रकल्पासहीत तीन सौर प्रकल्पाच्या माध्यमातून 5 हजार 200 शेतकर्यांना आता दिवसा वीजेची सोय झाली आहे. यावेळी महावितरणचे मुख्य अभियंता अशोक साळुंके, अधीक्षक अभियंता दिपक देवहाते, कार्यकारी अभियंता प्रफूल लांडे आदी उपस्थित होते.




