परतवाडा परिसरात दुर्मिळ हरियाल पक्षाची तस्करी

आरोपींना वन विभागाचे अभय

-निसर्ग व पक्षी प्रेमींमध्ये संताप
-प्रजाती नष्ट होण्याची भीती
अचलपूर / 17 जुलै : परतवाडा परिसरात दुर्मिळ व संरक्षित समजल्या जाणार्‍या हरियाल पक्ष्यांच्या तस्करीचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हीरूळपूर्ण गावात तीन आरोपींना पकडण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून सहा हरियाल पक्षी जप्त करण्यात आले आहेत. हे पक्षी पिंजर्‍यात ठेवून विक्रीसाठी सज्ज केले जात होते, अशी माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या गंभीर प्रकरणात परतवाडा वन विभागाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नाही, त्यामुळे विभागाच्या कार्यक्षमतेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.
गंभीर बाब अशी की, जे आरोपी यावेळी पकडले गेले आहेत, त्यांना याआधीही हरियाल पक्ष्यांच्या तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी वन विभागाने केवळ औपचारिक कारवाई करून प्रकरण थंडबस्त्यात टाकले होते. आता पुन्हा त्यांच्याकडून ग्रामीण भागातून हे पक्षी गोळा करून तस्करी करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. निसर्ग व पशु-पक्षी प्रेमींनी ही माहिती वन अधिकार्‍यांना दिली. मात्र वन विभागाने केवळ मौखिक उत्तर देत यासंदर्भाने मौन पाळले. त्यामुळे वन विभाग या गंभीर प्रकरणात लक्ष्य का घालत नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अटक करण्यात आरोपी पुन्हा हरियाल पक्ष्यांची तस्करी करत असल्याची माहिती मिळाली आहे. तपास सुरू आहे. अशी मोघम प्रतिक्रिया या प्रकरणावर वन परिक्षेत्र अधिकारी दिनेश वाळके यांनी दिली. तर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत धनदर म्हणाले, हरियाल पक्षी संरक्षित प्रजातीमध्ये येतात. त्यांना पकडणे आणि पिंजर्‍यात ठेवणे कायद्याने गुन्हा आहे. दोषींवर लवकरच कठोर कारवाई करण्यात येईल.
पर्यावरणप्रेमी संघटना आणि स्थानिक नागरिकांमध्ये परतवाडा वन विभागाच्या निष्क्रियतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, परतवाडा येथील वन अधिकारी दिनेश वाळके हे यापूर्वीदेखील वादग्रस्त कार्यशैलीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कार्यक्षेत्रात हरियालसारख्या दुर्मिळ पक्ष्यांची सर्रास तस्करी होत असूनही कुठलीही ठोस कारवाई न होणे, ही विभागीय उदासीनतेची आणि गंभीर दुर्लक्षाची लक्षणे आहेत.
हरियाल तस्करी प्रकरणाने परतवाडा वन विभागाच्या कार्यशैलीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुन्हेगार मोकाट फिरत आहेत आणि अधिकार्‍यांची ढिलाई पर्यावरणासाठी धोकादायक ठरत आहे. हरियाल पक्ष्यांची संख्या आधीच झपाट्याने घटत आहे. तस्करांवर वेळेत कठोर कारवाई न झाल्यास, पक्ष्यांची ही प्रजाती भविष्यात नामशेष होण्याची भीती नाकारता येत नाही. शासन पर्यावरण संवर्धनासाठी कितीही योजना आणत असले तरी जबाबदार अधिकारी सक्रिय नसतील, तर मुलभूत पातळीवर कोणताही बदल शक्य नाही. हे प्रकरण वन विभाग आणि प्रशासन किती गांभीर्याने घेतं, यावरच भविष्यातील पर्यावरणाची दिशा अवलंबून आहे.

संबंधित बातम्या

Back to top button