एसएमएस कंपनीचा विषारी खेळ उघड

आरोग्य विभागाचा अहवाल दडविला?

-वाघळी नदीत मासे व साप मृत्युमुखी
-दूषित पाणी थेट पिण्याच्या पाण्यात
-प्रशासनाविरोधात नागरिकांचा संताप उफाळला
नांदगाव पेठ/ 1 सप्टेंबर : नांदगाव पेठ परिसरात पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याशी सरळ खेळ करणारा प्रकार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मागील वर्षी 22 जुलै रोजी एसएमएस कंपनीचे दूषित व विषारी पाणी वाघळी नदीत मिसळल्याने हजारो मासे व साप क्षणात मृत्युमुखी पडले होते. केवळ जलचरच नव्हे तर नदीकाठावर येणार्‍या जनावरांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
घटनेनंतर आरोग्य विभागाने पंचनामा करून पाणी जलचर व जनावरांसाठी धोकादायक असल्याचा ठोस अहवाल तयार केला होता. मात्र हा अहवाल कंपनीच्या व्यवस्थापकाने दडवून ठेवल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरवर्षी एसएमएस कंपनीकडून बाहेर पडणारे विषारी पाणी निसर्गाचा र्‍हास करत आहे. त्याहून गंभीर म्हणजे हे केमिकलयुक्त पाणी नांदगाव पेठ परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यात मिसळत असल्याने गावकर्‍यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जनावरांचे जीव गेले, नदीतील जलचर संपले, पिण्याचे पाणी दूषित झाले, तरीही प्रशासनाने डोळेझाक केल्याचा आरोप होत आहे.
नागरिकांचा सवाल आहे की, जर कंपन्यांच्या दबावाखाली प्रशासन अहवाल दडवणार, तर लोकांच्या जीवाची सुरक्षा कोण करणार? आरोग्य विभागाचा ठोस अहवाल लपविणे म्हणजे थेट नागरिकांच्या आरोग्याशी खेळ असून, हा प्रकार पर्यावरणीय गुन्ह्याइतकाच गंभीर असल्याचे स्पष्ट होत आहे. प्रशासनाचे मौन नागरिकांच्या रोषाला खतपाणी घालत आहे. दरवर्षी विषारी पाण्याचा खेळ सुरू राहतो, नदी व प्राणिजीवन उध्वस्त होते आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. या निष्क्रियतेवरून नागरिकांचा संताप उफाळून आला असून, जर तातडीने कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
पंचायत समितीतील एका अधिकार्‍याने सांगितले की, आम्ही अहवाल प्रशासनाला सादर केला आणि एसएमएस कंपनीलाही पत्र दिले. मात्र नंतर कंपनीच्या व्यवस्थापकाने मुख्य अहवाल दडविल्याचे स्पष्ट झाले. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि कंपनीच्या व्यवस्थापनाची मिलीभगत असल्यामुळे या कंपनीवर ठोस कारवाई होत नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

संबंधित बातम्या

Back to top button