स्मार्ट मीटरमुळे दिवसा विजेचा वापर स्वस्त

अचलपूर विभागात स्मार्ट मीटरच्या सवलतीचे आणि सुविधाचे पथनाट्यातून जागर

अमरावती /22 फेब्रुवारी : स्मार्ट मीटरमुळे वीज ग्राहकांना मिळणार्‍या सुविधा आणि सवलतीचे महावितरण अचलपूर विभागात पथनाट्याच्या माध्यमातून जागर करण्यात येत आहे. स्मार्ट मीटरमुळे वीजेचे बिल जास्त येते ही अफवा असून स्मार्ट मीटरमुळे वीज ग्राहकांना शंभर टक्के अचूक बिल मिळते, शिवाय दिवसा वीज वापरावर प्रती युनिट 80 पैश्याची सवलत मिळत असल्याची माहिती या पथनाट्यातून देण्यात येत आहे.
मुख्य अभियंता अशोक साळुंके यांच्या मार्गदर्शनात आणि अधीक्षक अभियंता दिपक देवहाते यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात महावितरणतर्फे (9 ते 23 फेब्रुवारी) स्मार्ट मीटर जनजागृती पंधरवाडा राबविण्यात येत आहे. जनजागृती पंधरवाड्याचाच भाग म्हणून कार्यकारी अभियंता प्रदीप अंधारे यांचे संकल्पनेतुन निर्मित पथनाट्याची निर्मिती करण्यात आली असून दर्यापुर उपविभागीय कार्यालयातील तांत्रिक कर्मचार्‍यांनी उत्सफूर्त सहभाग नोंदवत गर्दीच्या ठिकाणी जावून पथ नाट्याचे सादरीकरण करून वीज ग्राहकांना बोली भाषेत स्मार्ट मीटरच्या सुविधाची माहिती देत आहे. महावितरण अचलपूर विभागात अचलपूर, परतवाडा आणि अंजनगावसुर्जी याठिकाणी पथनाट्याचे प्रयोग झाले आहे. वीज ग्राहकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, मीटर विषयी शंका असल्यास त्या दुर करण्यात येणार आहे. तसेच स्मार्ट मीटरमुळे दिवसा सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मिळणार्‍या विजेच्या वापरात प्रत्येक युनिटमागे 80 पैशाची सवलत देण्यात येते, त्यामुळे जास्त वीज वापर असलेली कामे स्वस्त विजेच्या वेळेत करण्याचे आवाहनही पथनाट्यातून करण्यात येत आहे. आधुनिक तंत्रज्ञावर आधारीत असलेले स्मार्ट मीटर स्वंयचलीत आणि वेळेत मीटर वाचन करत असल्याने, वीज बिलाशी संबंधित तक्रारी शंभर टक्के संपूष्टात येणार आहे. तसेच मीटरमुळे प्रत्येक तासाला वीज ग्राहकांना आपला वीज वापर किती झाला हे देखील मोबाईल एपवर समजण्याची सुविधा असल्याने वीज वापरावर सहज नियंत्रण मिळवता येणे शक्य आहे. अश्या अनेक लाभाची माहिती पथनाट्यातून वीज ग्राहकांना देण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button