एकविरा देवी मंदिरात चांदीच्या आभूषण ांना मिळतेय नवी झळाळी
शारदीय नवरात्रीची जोरदार तयारी

-सुवर्णकार बांधवांची सेवा
– साठ वर्षांची अखंड परंपरा
अमरावती / 14 सप्टेंबर : शहराच्या ग्रामदैवत असलेल्या श्री अंबादेवी आणि श्री एकविरा देवी मंदिरात शारदीय नवरात्रीच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू झाली आहे. देवी भक्तांच्या हृदयाला स्पंदन देणार्या या उत्सवासाठी मंदिर परिसर रंगीबेरंगी सजावटीनं नटू लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री एकविरा देवी मंदिरातील सर्व चांदीचे आभूषण आणि वस्तूंची झळाळी वाढवण्याचे पवित्र कार्य सुरू असून, ही सेवा शहरातील सुवर्णकार बांधव गेली तब्बल साठ वर्षांपासून निष्ठेने बजावत आहेत.
रविवारी अष्टमीच्या पर्वावर सकाळी दहापासून संपूर्ण दिवसभर सुवर्णकार बांधव देवीच्या सेवेतील या शुद्धीकरणाच्या कामात मग्न झाले होते. मंदिर संस्थेच्या विश्वस्तांच्या उपस्थितीत पुजार्यांनी देवीची सर्व चांदीची आभूषणं, भांडी आणि पूजाविधीतील वस्तू सभागृहात आणून यथायोग्य नोंद केली. त्यानंतर सुवर्णकार बांधवांच्या हाती सुपूर्द करण्यात आली. प्रत्येक वस्तूला भक्तिभावाने हाताळत शुद्धता आणि सौंदर्य वाढवण्याची प्रक्रिया पार पाडली गेली.
दरम्यान, नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं शहरातल्या मुख्य रस्त्यांवर सजावटीचे तोरणं आणि विद्युत रोषणाईचं काम सुरू झालं आहे. फुलांच्या माळांनी आणि दिव्यांच्या लखलखाटाने मंदिर परिसर सजू लागला आहे. व्यापार्यांनीही भक्तांच्या सोयीसाठी फुलं, सजावटीचं साहित्य आणि पूजाविधीसाठी लागणार्या वस्तूंची दुकाने मांडायला सुरुवात केली आहे. अमरावतीकरांच्या भावविश्वाशी घट्ट जोडलेल्या या नवरात्रोत्सवात भक्तिमय गजर, देवीच्या आरत्या, झेंडूच्या फुलांचा सुगंध आणि दिव्यांच्या प्रकाशात वातावरण मंत्रमुग्ध होण्याची तयारी सुरू झाली आहे. श्री अंबादेवी आणि श्री एकविरा देवीच्या गाभार्यात भक्तांच्या गर्दीने येत्या काही दिवसांत उत्सवाचा शिखर गाठणार हे निश्चित आहे.
-विशेष शुद्धीकरणाची पद्धत
आधी सोडा आणि आसूद मिसळलेल्या गरम पाण्यात या आभूषणांना आणि वस्तूंना ठेवण्यात आलं. त्यानंतर विशेष ब्रशने घासून स्वच्छ करण्यात आलं. मऊ कपड्यानं पुसून त्यांना झळाळी देण्यात आली. याचबरोबर सर्व वस्तूंची फायर टेस्ट करून शुद्धता पडताळणी करण्यात आली. देवीच्या सेवेतील या स्वच्छतेत उत्सव मूर्ती, पादुका, गदा, खड्ग, चवरंग, पाट, नक्षीकाम असलेली ताटं, निरंजन, संधपात्र, आचलणी, गडू, चंवर, दिवे, धूपर्ण, हळदी-कुंकवाची भांडी, पाळ, वाट्या, समई, कलश, मुखवटे, गळ्यातील दागिने, झुंबर, बकेट, गंगाळ आणि छत्री अशा असंख्य वस्तूंचा समावेश होता.




