आक्षेपार्ह ठिकाणी लागलेली शिवरायांची पोस्टर्स झाकण्यास सुरुवात

युवक काँग्रेसचा तीन तास ठिय्या

-आंदोलनासमोर मनपा प्रशासन नमले
अमरावती / 18 सप्टेंबर : शहरातील मुतारी, कचर्‍याची ढिगारे, दारू दुकाने, स्मशानभूमीच्या भिंती आणि गल्ल्यांवर लावण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोस्टर्सच्या अवमानकारक प्रकारावर अखेर युवक काँग्रेसच्या ठिय्या आंदोलनाचा परिणाम झाला. युवक काँग्रेसच्या संतप्त भूमिकेपुढे महापालिका प्रशासनाने नमते घेत शहरातील अशी सर्व आक्षेपार्ह पोस्टर्स रंगवण्याचा निर्णय घेतला असून याची प्रत्यक्ष सुरुवात आजच करण्यात आली.
दोन दिवसांपूर्वीच युवक काँग्रेसने आंदोलन छेडत या पोस्टर्सवर आक्षेप नोंदवला होता. त्यांनी स्वतः पोस्टर्स झाकून ठेवण्याची कारवाई केली आणि सिटी कोतवालीकडे अधिकृत तक्रारही दाखल केली होती. त्यानंतर काल प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अमरावती दौर्यात पोलिस आयुक्तांशी फोनवर या संदर्भात चर्चा करून कठोर कारवाईची मागणी केली होती. तरीही प्रशासनाकडून थेट हालचाल झाली नव्हती.
परंतु आज या पोस्टर्सलगत लघुशंका करणारे फोटो सोशल मीडियातून युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांपर्यंत पोहोचताच संताप अनावर झाला. यामुळे युवक काँग्रेसच्या प्रतिनिधींनी थेट महापालिका आयुक्तांच्या दालनात धडक देत स्पष्टीकरणाची मागणी केली. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक बैठकीमुळे कोणीही वरिष्ठ अधिकारी हजर नव्हता. परिणामी युवक काँग्रेस पदाधिकार्‍यांनी दालनातच ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजी केली. सुमारे तीन तास सुरु राहिलेल्या या ठिय्या आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसने कडक भूमिका घेतली. त्यांनी जाहीर केले की शिवरायांचा अपमान अमरावतीत सहन केला जाणार नाही. तसेच या कारणावरून शहरात कुठलीही अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी मनपा व पोलिस प्रशासनावर राहील, असेही पदाधिकार्‍यांनी बजावले.
अखेर या आक्रमक भूमिकेपुढे महापालिका प्रशासनाने युवक काँग्रेसची मागणी मान्य केली. युवक काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत मनपाने पोस्टर्स रंगवण्यास सुरुवात केली असून पुढील दोन दिवसांत अशा ठिकाणी लागलेली सर्व आक्षेपार्ह पोस्टर्स एका झटक्यात रंगवून टाकली जाणार असल्याचे आश्वासन दिले. युवक काँग्रेसने शहरातील नागरिकांना देखील आवाहन केले की, शिवछत्रपतींचा सन्मान जपत कुठे अशा प्रकारची पोस्टर्स दिसल्यास तत्काळ मनपा किंवा युवक काँग्रेसशी संपर्क साधावा.
या ठिय्या आंदोलनात युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख, माजी प्रदेश सचिव समीर जवंजाळ, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनिकेत ढेंगळे, प्रदेश सचिव सागर कलाने, बडनेरा विधानसभा उपाध्यक्ष आशिष यादव, जिल्हा महासचिव निखिल बिजवे, एनएसयुआय शहराध्यक्ष संकेत साहू तसेच धनंजय बोबडे, मोहित भेंडे, आकाश धुराटकर, शुभम बांबल, आकाश गेडाम, चैतन्य गायकवाड, कौस्तुभ देशमुख यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button