दर्यापुरात ‘शिवाई’ बस पेटली

चालकाच्या समयसूचकतेने डझनभर प्रवाशांचे प्राण वाचले

* अग्निशमन दलाच्या विलंबाने संताप; रेल्वे गेटसमोरील घटना

दर्यापूर/12 मार्च : भरदुपारी दोन वाजेच्या सुमारास दर्यापूर शहरात काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. अकोला आणि परतवाडा मार्गावरून येणार्‍या राज्य परिवहन मंडळाच्या बसला रेल्वे फाटकासमोर अचानक भीषण आग लागली. इंजिनातून निघणारा धूर आणि आगीच्या ज्वाळा पाहून चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बसमधील चालक, वाहकासह डझनभर प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले. मात्र, नगर परिषदेचे अग्निशमन दल वेळेवर न पोहोचल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, दर्यापूर आगाराची ’हिरकणी’ (एम.एच. 09 ई.एम. 2260) आणि अकोल्याहून येणारी विद्युतवर चालणारी ’शिवाई’ बस या प्रवासादरम्यान असताना रेल्वे गेटजवळ हा अपघात घडला. दुपारी दोनच्या सुमारास बसच्या इंजिनमधून अचानक धूर निघू लागल्याचे चालकाच्या लक्षात आले. क्षणाचाही विलंब न लावता चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी केली आणि प्रवाशांना तातडीने खाली उतरण्यास सांगितले. प्रवासी खाली उतरत असतानाच आगीने रौद्र रूप धारण केले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, ही घटना नगर परिषद कार्यालयापासून अगदी जवळ घडली. स्थानिकांनी तातडीने संपर्क करूनही अग्निशमन बंब वेळेवर दाखल झाला नाही. दरम्यान, परिसरातील तरुणांनी आणि नागरिकांनी पाण्याचा मारा करून आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. बस पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यानंतर अग्निशमन दल पोहोचल्याने प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनावर नागरिकांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. या भीषण आगीमुळे दर्यापूर रस्त्यावरील वाहतूक बराच वेळ विस्कळीत झाली होती. ’अंत भला तर सर्व भला’ या उक्तीप्रमाणे सर्व प्रवासी सुखरूप असल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी, वाहनांच्या तांत्रिक सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
प्रवाशांच्या जीवाशी खेळ कधी थांबणार?-एसटी महामंडळाच्या तांत्रिक विभागाकडून गाड्यांची नियमित देखभाल केली जाते का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. भररस्त्यात बसचा असा भडका उडणे ही प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी धोक्याची घंटा आहे. वेळीच उपाययोजना न केल्यास भविष्यात मोठ्या जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही.

संबंधित बातम्या

Back to top button