शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांची प्रकृती बिघडली
भाजप-शिवसेना युती अमरावती महापालिकेत तुटण्याच्या मार्गावर?

* शिवसेनेची पत्रकार परिषद वेळेवर रद्द
* महायुतीत गोंधळ कायम
अमरावती/28 डिसेंबर -15 जानेवारीला होणार्या अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय तापमान तीव्र झाले आहे. भाजप आणि शिवसेनेमधील युतीबाबत चर्चा सुरू असताना, शिवसेनेचे वरिष्ठ नेते आनंदराव अडसूळ यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करावे लागले. यामुळे जागावाटपाच्या चर्चेत तातडीने अडथळा निर्माण झाला आहे.
राज्यातील महापालिका निवडणुकीच्या वेळापत्रकानंतर, अमरावतीतील राजकीय पक्ष मोर्चेबांधणीस लागले आहेत. दुपारी शिवसेनेने भाजपसमोर काही जागांसाठी प्रस्ताव ठेवला होता, मात्र भाजपने तो प्रस्ताव स्वीकारला नाही. अडसूळ यांची प्रकृती बिघडल्यामुळे आता दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा एकदा जागावाटपासाठी चर्चा सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना शिवसेना आणि भाजप वेगळे लढले, तर दोन्ही पक्षांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेत युती टिकवणे दोन्ही पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे.
रविवारी रोजी शिवसेना (शिंदे गट) कडून जिल्हा मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. शहरातील सर्व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित झाले, मात्र वेळेपूर्वी संपर्क प्रमुख आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी परिषद रद्द करण्याचे फर्मान दिल्यामुळे पत्रकार परिषद अचानक रद्द झाली. यामुळे ‘खोडा पहाड निकला चुहा’ अशी परिस्थिती निर्माण झाली.
अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असतानाही, भाजप-शिवसेना युतीत जागेबाबत तिढा सुटत नसल्याचे चित्र आहे. भाजप शिवसेनेला 10-12 जागा देण्याच्या मनस्थितीत आहे, तर युवा स्वाभिमान पक्षाला 8-10 जागा देण्याच्या तयारीत आहे. शिवसेना (शिंदे गट) 35 जागांवर अडून आहे. माजी आमदार जगदीश गुप्ता यांनी प्रसार माध्यमांना सांगितले की, निर्णय लवकरच संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून, ‘वेळ कमी आहे, पण सर्जिकल स्ट्राईक करू’ असे वक्तव्य त्यांनी दिले. 2017 मध्ये भाजपने महापौरपद जिंकले होते. त्या वेळी 45 जागांवर विजय मिळवून चेतन गावंडे यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडली होती. काँग्रेसला 15, शिवसेनेला 7, एमआयएमला 10, बहुजन समाज पक्षाला 5, युवा स्वाभिमान पक्षाला 3, तर अपक्ष उमेदवार आणि आरपीआय आठवले गटाला प्रत्येकी 1 जागा मिळाली होती. राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, युतीचे अंतिम स्वरूप अजून ठरलेले नाही.
शिवसेनेचे वरिष्ठ नेते आनंदराव अडसूळ यांची प्रकृती बिघडल्याने जागा वाटपाच्या चर्चेत खोडा निर्माण झाला आहे. यावेळी भाजपचे आमदार संजय कुटे आणि माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी रूग्णालयात भेट देऊन नेत्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली.




