भोलेश्वर महादेव मंदिरात शंकर-पार्वती विवाह
महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने भक्तिमय वातावरण

अमरावती / 19 फेब्रुवारी – विदर्भाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या अमरावती शहराचे श्रद्धास्थान आणि महाभारतकालीन वारसा लाभलेल्या श्री भोलेश्र्वर मंदिरात शिव-पार्वती विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. जुनी टाकसाळ परिसरातील या जागृत देवस्थानात विधीवत पूजा, नंदीची भव्य शोभायात्रा आणि भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसर शिवभक्तीने न्हाऊन निघाला होता. ऐतिहासिक महती असलेल्या या मंदिरात परंपरेचे जतन करत महिला शक्तीचा जागर आणि भक्तीचा अनुपम संगम या निमित्ताने पाहायला मिळाला.
अमरावतीच्या पवित्र भूमीवर उभे असलेले श्री भोलेश्र्वर मंदिर केवळ एक वास्तू नसून ती जिवंत श्रद्धेची मूर्ती आहे. भगवान श्रीकृष्णांनी रुक्मिणी हरणाच्या वेळी येथे वास्तव्य केल्याचे दाखले इतिहासात मिळतात. याच ठिकाणी कृष्णाने बाण मारून तयार केलेली विहीर आजही त्या ऐतिहासिक क्षणांची साक्ष देते. अशा या पावन धामी बुधवारी भोलेश्र्वर आरती मंडळाच्या वतीने हळदी-संगीत आणि विवाह उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक वेशभूषेतील महिलांच्या भव्य मिरवणुकीने झाली. पिवळ्या वस्त्रांमधील महिलांनी काढलेली शिवपिंडी आणि नंदीची शोभायात्रा आकर्षणाचे केंद्र ठरली. ढोल-ताशांच्या गजरात आणि ’हर हर महादेव’च्या जयघोषात मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. मंदिराच्या जडणघडणीत पतंगराव परिवाराचे योगदान मोलाचे आहे. स्व. अनुसयाबाई पतंगराव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला मंदिराचा कायापालट आजही भाविकांच्या स्मरणात आहे. तोच वारसा आता यश पतंगराव आणि त्यांचे सहकारी अत्यंत निष्ठेने पुढे चालवत आहेत. या सोहळ्यासाठी राज पतंगराव, सोनू गुजरे, अभिषेक गुजरे, अमित शिंगणे, आशिष पुरोहित, विकास गायकवाड, रोहित वानखडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.




