‘सात-बारा कोरा कोरा यात्रे’ला पापळमधून सुरुवात
बच्चू कडूंचा पून्हा राज्य सरकारविरोधात एल्गार

-भर पावसात शेकडो शेतकर्यांची हजेरी
-यात्रेत महिला-पुरुषांचा मोठ्या संख्येने सहभाग
पापळ / 7 जुलै: देशाचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पापळ येथून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली ‘7/12 कोरा कोरा कोरा’ यात्रेला आजपासून सुरुवात झाली. उंबर्डा बाजार, मानकी, वळसा, तिवरी, तुपटाकळी, काळी दौलत, गुंज अशी गावे करत चिलगव्हाण या स्व. साहेबराव करपे यांच्या गावामध्ये या यात्रेची सांगता होणार आहे. पहिल्या शेतकरी आत्महत्येची नोंद या गावी झाली होती. सुमारे 138 किमीच्या या यात्रेला शेतकरी, विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी भर पावसात मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आहे. सरकारने सातबारा कोरा केलाच पाहिजे अशी मागणी करीत शेतकरी मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी होत आहेत.
आज सकाळपासून पापळ येथून सुरु झालेल्या ‘सात-बारा कोरा कोरा’ यात्रेत शेतकरी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. 14 जुलै रोजी चिलगव्हाण येथे या यात्रेची जाहीर सांगता सभा होणार आहे. 8 दिवसांच्या कालावधीत एकूण 138 किमी पदयात्रा चालणार आहे. बच्चू कडू ‘सात-बारा कोरा कोरा’ यात्रेच्या माध्यमातून गावागावात शेतकर्यांना, कष्टकरी समाजाला भेटून त्यांच्या समस्या समजून घेणार आहेत.
या यात्रेत सहभागी झालेल्या आंदोलक शेतकर्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळी लाडकी बहीण योजना आणली त्यावेळी कोणती समिती गठीत केली काय? तर नाही मग शेतकर्यांना कर्जमाफी देण्यासाठी समिती कशाला तयार करत आहेत थेट घोषणाच केली पाहिजे, अशी मागणी शेतकर्यांनी यावेळी केली. बच्चू कडू यांनी ज्यावेळी अन्नत्याग आंदोलन केले. त्यावेळी या सरकारने व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीबाबत आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी ते पूर्ण केलेले नाही. काल आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री फडणवीस पंढरपूरला विठूरायाच्या शासकीय पूजेला गेले होते. त्यावेळी लाखो शेतकरी, भाविक उपस्थित होते.
त्यांच्या समोर देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी, सातबारा कोरा करण्याची घोषणा करायला हवी होती, मात्र, ती त्यांनी केली नसल्याने सरकारची आश्वासने फसवी आहेत, अशी टीका आंदोलक शेतकर्यांनी केली. सर्व जाती धर्मातील लोकांनी एक व्हा, मत कोणालाही द्या, पण कर्जमाफीसाठी एक व्हा, असे आवाहन बच्चू कडू यांनी केले आहे.




