राजकारण बाजूला ठेवत, खेळाडूंसोबत आ.रवी राणा झाले क्रिकेटपटू

अमरावती/29 डिसेंबर : शिक्षण महर्षी डॉ.श्री.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 127 व्या जयंती उत्सवानिमित्त श्री. शिवाजी शिक्षण संस्था कर्मचारी तसेच मॉर्निंग क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मॉर्निंग चषक भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामने दिनांक 21 डिसेंबर ते 28 डिसेंबर 2025 या कालावधीत अमरावती शहरातील रूरल इन्स्टिट्युट क्रिडांगण, पंचवटी चौक येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या सामन्याला बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. रवी राणा यांनी भेट देत खेळाडूंचा उत्साह द्विगुणित केला. मैदानात उपस्थित समस्त असलेल्या खेळाडूंच्या जोशपूर्ण खेळाने प्रभावित होत आमदार रवी राणा यांना मोह न आवरता स्वतः मैदानात उतरून खेळाडूंसोबत क्रिकेट खेळण्याचा मनमुरादपणे आनंद घेतला. याप्रसंगी आमदार रवी राणा यांच्या या अचानक आणि उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण मैदानात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. खेळाडूंनी मोठ्या आनंदात व जोशात त्यांच्या सोबत खेळत हा क्षण अविस्मरणीय बनवला. आमदार रवी राणा यांनी उपस्थित खेळाडू, आयोजक आणि क्रीडाप्रेमींना शुभेच्छा देत मैदानी खेळांमुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच संघभावना, शिस्त व नेतृत्वगुण विकसित होतात, असे मत यावेळी आमदार राणा यांनी बोलताना व्यक्त केले. मॉर्निंग चषक क्रिकेट स्पर्धेमुळे परिसरातील क्रीडाप्रेमींना व्यासपीठ मिळाले असून युवा खेळाडूंमध्ये नवचैतन्य संचारले आहे. या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक समितीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.




