सेवा पंधरवडा उद्यापासून-लोकाभिमुख उपक्रमांना गती

पाणंद रस्त्यांपासून तर सर्वांसाठी घरांपर्यंत

-नावीन्यपूर्ण मोहिमेतून होणार विविध कामे
-जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांनी दिला रोडमॅप
अमरावती / 15 सप्टेंबर : राज्य शासनाच्या निर्देशानुसार 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान अमरावती विभागात सेवा पंधरवडा उपक्रम राबविण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जन्मदिवसापासून तर महात्मा गांधी जयंतीपर्यंत चालणारा हा उपक्रम महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी राबविण्यात येत आहे. विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल आणि जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी स्वतंत्ररीत्या आयोजित बैठकीत याची माहिती दिली.
सेवा पंधरवडा तीन टप्प्यांत होणार असून पहिल्या टप्प्यात 17 ते 22 सप्टेंबर दरम्यान पाणंद व शिवार रस्त्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. या काळात पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण, सीमांकन, ग्रामनकाशांवर नोंदणी तसेच शेतरस्त्यांच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा ‘रस्ता अदालत’च्या माध्यमातून केला जाणार आहे. तसेच या रस्त्यांना अधिकृत क्रमांक देऊन दुतर्फा वृक्षलागवड करण्याची कामेही हाती घेतली जातील. दुसर्‍या टप्प्यात 23 ते 27 सप्टेंबरदरम्यान सर्वांसाठी घरे मोहिम राबवली जाणार आहे. यामध्ये भूमिहीन व बेघर कुटुंबांना घरे बांधण्यासाठी शासकीय जमिनी कब्जे हक्काने देण्यात येतील. शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करण्याची कार्यवाही होणार असून नगरपरिषद, महापालिका आणि ग्रामपंचायती मिळून सुमारे दीड हजारांहून अधिक पट्टेवाटप केली जातील.
जिल्ह्यातील 96 मंडळांत महाराजस्व शिबिरे आयोजित होऊन दाखले व अन्य सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या टप्प्यात विभागभर 300 गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा नवाच उपक्रम राबविला जाणार आहे. तिसर्‍या टप्प्यात, 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान नावीन्यपूर्ण उपक्रमांना गती दिली जाईल. यामध्ये जिवंत सातबारा योजना, जनसंवाद कार्यक्रम, आदेश तपासणी, तसेच गाव तिथे स्मशानभूमी या मोहिमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. आतापर्यंत सात हजारांहून अधिक नोंदी ‘जिवंत सातबारा’ मोहिमेत सामील करण्यात आल्या आहेत. याशिवाय आदिवासी भागांसाठी आदिसेतू उपक्रम, विमुक्त भटक्या समाजातील लाभार्थ्यांना ओळखपत्रे व प्रमाणपत्रे देणे, हरित महाराष्ट्र वृक्षलागवड, तांडा समृद्धी योजना, लोकअदालत यांसारखे उपक्रमही यात समाविष्ट आहेत.
दरम्यान, सेवा पंधरवडाबरोबरच विभागात 150 दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत विविध कामे होतील. त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात बिंदुनामावली तपासणी शिबिरे होणार असून सरकारी विभागांचे रेकॉर्ड तपासले आणि अद्ययावत केले जाणार आहेत. या शिबिरांची सुरुवात अकोला जिल्ह्यातील नियोजन भवनात 16 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता होणार आहे, असे विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी सोगितले. सेवा पंधरवड्यात महसूल, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद तसेच इतर विभाग सहभागी होत असून नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा आणि शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल आणि जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.
-जिल्ह्यासाठी आदर्श ठरणारा पाणंद रस्ता पॅटर्न
जिल्हाधिकारी येरेकर यांनी सांगितले की, अमरावती जिल्ह्यात राबविलेला पाणंद रस्त्यांचा पॅटर्न राज्य शासनाने स्वीकारला आहे. त्यामुळे या मोहिमेत रस्ते मोकळे करणे, त्यांचे सीमांकन व वृक्षारोपण हा महत्त्वाचा घटक ठरणार आहे. यामुळे शेतकर्‍यांना थेट लाभ होणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button