17 मार्चला विविध समिती सदस्यांची निवड

मनपा आमसभा विशेेष मुद्यावर गाजण्याची शक्यता

* पक्षाचे गटनेते सभापतींकडे सादर करणार नावे

अमरावती/9 मार्च – शहराच्या विदारक स्वच्छता मोहिमेवर विशेष सभा गाजवल्यानंतर आता अमरावतीकरांच्या नजरा 17 मार्च रोजी होणार्‍या महापालिकेच्या आमसभेवर खिळल्या आहेत. या सभेत शिक्षण, शहर सुधार, विधी आणि महिला व बालकल्याण अशा चार महत्त्वाच्या विषय समित्यांच्या प्रत्येकी नऊ सदस्यांची निवड केली जाणार आहे. पक्षाच्या संख्याबळावर गटनेते आपल्या सदस्यांची नावे सभापतींकडे सोपवणार असून, त्यानंतर सभापती या नावांची घोषणा करतील. या निवडीसाठी राजकीय वर्तुळात मोठी फिल्डिंग लावली जात असून नगरसेवकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.
या आगामी सभेसाठी नवनिर्वाचित नगरसेवकांनी प्रश्नांची आणि प्रस्तावांची जणू सरबत्तीच लावली आहे. प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुने अनेक प्रश्न अद्याप प्रलंबित असतानाच आता 35 हून अधिक नवीन प्रश्न प्रशासनाकडे धडकले आहेत. उद्या 10 मार्च रोजी या सभेची रीतसर सूचना निघणार असून, नगरसचिवांकडे प्रश्नांचा ओघ सुरू झाला आहे. यामध्ये शिवसेनेचे संजय गव्हाणे यांनी 5, भाजपच्या सुरेखा लुंगारे यांनी 4, युवा स्वाभिमानच्या प्रियंका पाटने यांनी 4, भाजपचे आशिष अतकरे यांनी 3, काँग्रेसचे संजय शिरभाते यांनी 3, भाजपचे मिलिंद बांबल यांनी 3 आणि प्रशांत महल्ले यांनी 3 प्रश्न व प्रस्ताव सादर केले आहेत. विषय समित्यांच्या सदस्य निवडीनंतर पुढील सभेत सभापती आणि उपसभापतींची निवड होणार असल्याने महापालिकेत सध्या कमालीची राजकीय हालचाल वाढली आहे. गेल्या सभेत स्वच्छतेच्या मुद्द्यावरून प्रशासनाला धारेवर धरणार्‍या नगरसेवकांचा जोश पाहता, 17 मार्चची ही आमसभा चांगलीच गाजण्याची चिन्हे आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button