विदर्भात 23 जूनला वाजणार शाळांची घंटा

नवीन तारीख आणि वेळ जाहीर

-28 पर्यत सकाळच्या सत्रात
-30 जूननंतर नियमित सत्रात शाळा
अमरावती / 16 जून: नव्या शैक्षणिक सत्रातील शाळा कोणत्या दिवशी सुरू करायच्या, याचे नेमके आदेश शाळांना प्राप्त न झाल्याने जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. अखेर माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांनी आज, 16 जूनला नवे आदेश काढले. त्यानुसार सर्व शासकीय, अनुदानित आणि खासगी (सीबीएसईसह), सर्वच शाळा 23 जूनला सकाळच्या सत्रात सुरू होणार आहेत. सध्याच्या तापमानाची वाढ बघता 28 जूनपर्यंत शाळा सकाळच्या सत्रात राहणार आहेत. तर 30 जूननंतर नियमित वेळेत सुरू होणार आहेत.
राज्यभरातील शाळांच्या वेळापत्रकात सुधारणा आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने राज्यभरासाठी वेगवेगळे निर्णय गेल्या काही काळात घेतले. 30 एप्रिलपर्यंत भर उन्हात शाळा घेण्यापासून ते 1 मे रोजीच सगळे निकाल जाहीर करण्यापर्यंतचे निर्णय याच सुसूत्रीकरणाच्या दाव्यातून घेण्यात आले. यंदाच्या शैक्षणिक सत्रात विदर्भातील शाळा 23 जून रोजी सुरू करण्यात येतील, असे शिक्षण विभागाने राज्यस्तरावरून जाहीर केले होते. 23 ते 28 जूनदरम्यान सकाळी 7 ते दुपारी 11.45 या वेळेत शाळा घेण्यात यावी. त्यानंतर, 30 जूनपासून नियमित वेळेत वर्ग घ्यावेत, असे शिक्षण संचालनालयाने 29 एप्रिल रोजी काढलेल्या परिपत्रकात म्हटले होते.
राज्याच्या शिक्षण विभागाने आदेश काढले तरी जिल्ह्यातील शाळांसाठी शिक्षणाधिकार्‍यांना आदेश काढावे लागतात. सर्व शाळा या आदेशांचे पालन करतात. शाळा सुरू होण्यासंदर्भात अद्यापपर्यंत असे कोणतेही आदेश जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने काढलेले नाहीत. त्यामुळे, नेमक्या कोणत्या दिवशी विद्यार्थ्यांना शाळेत बोलवावे याबाबतचा संभ्रम निर्माण झाला होता. अखेर सोमवारी आदेश जाहीर झाले असून 23 ते 28 जूनदरम्यान सकाळी 7 ते दुपारी 11.45 या वेळेत शाळा राहणार आहेत. तर 30 जूनपासून नियमित वेळेत शाळा सुरू होणार आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button