अमरावती विभागात जलसाठ्यांची समाधानकारक स्थिती
अप्पर वर्धासह प्रमुख प्रकल्प लबालब

-पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली
अमरावती / 31 जुलै : पश्चिम विदर्भात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे अमरावती विभागातील सर्वच प्रमुख धरणे व जलाशय लक्षणीय प्रमाणात भरली आहेत. परिणामी, पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झाली असून सिंचनासाठीही पुरेसा साठा उपलब्ध झाला आहे.
अमरावती विभागातील अप्पर वर्धा धरण, हा प्रमुख जलप्रकल्प असून, सध्या ते 57 टक्के भरले आहे. धरणाच्या कॅचमेंट क्षेत्रात पाऊस सुरू राहिल्यास पुढील आठवड्यात धरणातून पाणी सोडावे लागू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. विभागातील 9 मोठ्या जलप्रकल्पांमध्ये सध्या 670 दलघमी (48 टक्के) पेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हा साठा 8 टक्क्याने अधिक असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. विभागातील 27 मध्यम प्रकल्पांमध्ये सुमारे 480 दलघमी म्हणजेच 62 टक्के जलसाठा झाला आहे. केवळ एका आठवड्यात साठ्यात 6 टक्के वाढ झाली आहे.
संपूर्ण अमरावती विभागातील 253 प्रकल्पांमध्ये साठ्यात लक्षणीय वाढ झाली असून, आता एकूण 1554 दलघमी म्हणजेच 50 टक्के साठा झाला आहे. येत्या काही दिवसांत अजून पावसाची शक्यता असल्यामुळे जलसाठ्यात आणखी भर पडेल.
पावसामुळे काही जलप्रकल्पांमधून पाणी सोडावे लागत आहे. सध्या सायखेडा प्रकल्प: 31 क्यूसेक, वाघाडी प्रकल्प: 10 क्यूसेक, निर्गुणा (अकोला): 0.9 क्यूसेक, घुंगशी बॅरेज: 164 क्यूसेक, अडाण (वाशिम): 9.97 क्यूसेक, सोनल प्रकल्प: 0.06 क्यूसेक, उतावली (बुलढाणा): 6.44 क्यूसेक याप्रमाणे पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. एकुणच अमरावती विभागात सध्या जलसाठ्याची स्थिती समाधानकारक आहे. पिण्याचे पाणी आणि सिंचनाच्या दृष्टीने हा साठा पुरेसा असून, पुढील काही दिवसांत अजूनही साठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे.




