सतीधाम मार्केटची गॅलरी कोसळली, जीवितहानी नाही
सरोज चौकात मोठा अनर्थ टळला!

-रात्री 10.30 वाजताची घटना
-दुकाने बंद असल्याने सुदैवाने वर्दळ नव्हती
-अग्निशमन दल व पोलिस घटनास्थळी
अमरावती / 12 सप्टेंबर : शहरातील सरोज चौक परिसरात शुक्रवारी रात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेत सतीधाम मार्केटच्या दर्शनी भागातील गॅलरीचा मोठा भाग अचानक कोसळला. रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. किंवा कोणालाही दुखापत सुद्धा झाली नाही.
सरोज चौकातील सतीधाम मार्केट ही सुमारे 40 ते 45 वर्षे जुनी इमारत असून, तिच्या दर्शनी गॅलरीचा एक भाग अचानक कोसळून रस्त्यावर पडला. सरोज चौकातून कॉटन मार्केटकडे जाणार्या मुख्य रस्त्याला जोडणार्या या अरुंद मार्गाला संगित गल्ली म्हणून ओळखले जाते. सतीधाम मार्केट आणि आजूबाजूला दुकाने व व्यापारीपेठ असल्याने या मार्गावर नेहमी दिवसभर मोठी वर्दळ असते. पण रात्री दुकाने बंद झाल्याने आणि रस्ता सुनसान असल्याने कोणताही नागरिक ढिगार्याखाली अडकला नाही. परिणामी मोठा अनर्थ टळला.
घटनेच्या वेळी जवळच महाकाली नवरात्रोत्सव मंडळाचे काही युवक कार्यकर्ते चर्चा करत उभे होते. अचानक झालेल्या मोठ्या आवाजाने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने कोणीही जखमी झाले नसल्याचे लक्षात आल्याने सर्वांना दिलासा मिळाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि शहर कोतवाली पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी इमारतीची पाहणी केली. प्राथमिक अंदाजानुसार सतत पडणार्या पावसामुळे इमारत जर्जर झाली असून त्यामुळे गॅलरीचा भाग कोसळल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या घटनेनंतर परिसरातील नागरिक आणि व्यापार्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, जुन्या इमारतींची तातडीने तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक पातळीवर जोर धरत आहे.




