नरसम्मा महाविद्यालयांमध्ये संत गाडगेबाबा पुण्यतिथी संपन्न

अमरावती /20 डिसेंबर : कर्मयोगी संत गाडगेबाबा यांचे विचार व कार्य आजच्या सामाजिक परिस्थितीत अत्यंत प्रेरणादायी असून त्यांच्या विचारांची समाजाला नितांत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन श्रीमती नरसम्मा महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. राजेश चंदनपाट यांनी केले.
संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. संत गाडगेबाबांनी तळागाळातील समाजाला केंद्रस्थानी ठेवून व्यवहार्य तत्त्वज्ञान मांडले. कीर्तन, प्रवचन आणि प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून त्यांनी समाजप्रबोधनाचे कार्य केले. अंधश्रद्धा, कर्मकांड आणि सामाजिक विषमता यावर त्यांनी प्रभावी शब्दांत प्रहार केला. स्वच्छतेचे महत्त्व केवळ उपदेशातून नव्हे, तर स्वतः झाडू हातात घेऊन त्यांनी समाजाला कृतीतून शिकवले. शिक्षणाशिवाय समाजाचा विकास शक्य नाही, हा विचार त्यांनी आयुष्यभर जोपासला आणि विशेषतः मुला-मुलींना शिक्षण मिळालेच पाहिजे, यावर त्यांनी भर दिला, असेही यावेळी नमूद करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य मा. डॉ. राजेश चंदनपाट यांनी संत गाडगेबाबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर संत गाडगेबाबांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन करण्यात आले. त्यांच्या विचारांचा अवलंब केल्यास स्वच्छ, सुसंस्कृत व विवेकी समाजनिर्मिती होऊ शकते, असा संदेश यावेळी देण्यात आला. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती. सर्व उपस्थितांनी संत गाडगेबाबांच्या विचारांना आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या अभ्यासेत्तर उपक्रम समिती व राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.




