वाळुची तस्करी, तीन ट्रॅक्टर व एक ट्रक जप्त

तिवसा महसूल विभागाची कारवाई

-बाळु माफियांचा परिसरात हैदोस
तिवसा / 20 जुलै : तिवसा महसूल हद्दीत नदीपात्रात गैरकायदेशीररीत्या गौन खनिजाचे उत्खनन आणि त्याच्या तस्करीचे प्रकार वाढले असताना त्याविरोधात महसूल विभागाने कंबर कसल्याचे दिसून आले आहे. अवैधरीत्या वाळुची वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर आणि एक ट्रक अशी चार वाहने महसूल विभागाने जप्त केली आहे. एकाच दिवशी करण्यात आलेल्या या कारवाईने या अवैध वाळु तस्करी व्यवसायात गुंतलेल्या वाळु माफियांचे धाबे दणाणले असल्याचे बोलले जात आहे.
नायब तहसीलदार आशिष नागरे यांच्या नेतृत्वात महसूल विभागाने वाळु तस्करांविरोधात मोहिम राबविली. तिवसा महसूल हद्दीत येणार्‍या चांदुर ढोरे, भारवाडी, उंबरखेड, जावरा यासह अनेक याठिकाणीहुन गेल्या काही दिवसापासून रोजरासपणे अवैध वाळूचा उपसा करत वाहतूक केली जात असल्याच्या तक्रारी महसूल विभागाला प्राप्त झाल्या आहेत. दरम्यान पहाटे गस्त करत असताना ट्रॅक्टरने अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती नायब तहसीलदार नागरे यांच्या पथकाला मिळाली. यावेळी भारवाडी नदी घाटातून दोन, तर उंबरखेड घाटातून वाळूचा एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आला.
तसेच मोझरी येथील दासटेकडी मार्गावर कनान वाळूचा एक ट्रक पकडण्यात आला. ही कारवाई तहसीलदार डॉ. मयूर कळसे यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार आशिष नागरे, तलाठी स्वप्नील भुयार, चरणसिंग दुलत, नरेश माळोदे यांनी केली. तिवसा महसूलकडून पहाटे चार वाजता दरम्यान तीन ट्रॅक्टर व एका ट्रकवर जप्तीची धडक कारवाई झाल्याने तालुक्यातील वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली असल्याचे समजते. तर तालुक्यात अवैधरीत्या वाळू, मुरूम तस्करीचा अवैध व्यवसायाचे प्रमाण पाहता, ही किरकोळ कारवाई किरकोळ असल्याची चर्चा आहे. बाळु माफियांवर अंकुश लावण्यात स्थानिक मंडळ अधिकारी, तलाठी असमर्थ असल्याचे बोलले जाते.
तिवसा तालुक्यात वर्धा नदीतील काळी वाळू व कनान वाळूचे सर्वाधिक ठिय्ये हे गुरुदेवनगर, मोझरी गावात असून रात्रीसह दिवसा वाहतूक केली जाते. परंतु स्थानिक मंडळ अधिकारी, तलाठी यांच्याकडून अजूनपर्यंत एकाही ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली नाही हे विशेष.

संबंधित बातम्या

Back to top button