जिद्दीला सलाम; ‘बिग बीं’समोर वैदर्भीय स्नेहल जावरे

आईच्या परिश्रमाचे चीज

अंजनगाव बारी/1 ऑक्टोबर : नवरात्रोत्सव म्हणजे स्त्रीच्या जिद्दीला, संघर्षाला आणि यशाला वंदन करण्याचा हा सण. अशीच प्रेरणादायी कहाणी आहे अंजनगाव बारी येथील स्नेहल विशाल जावरे हिची. आई बेबी हिच्या त्यागाने आणि स्वतःच्या मेहनतीने ती सध्या नागपूर येथे तलाठी म्हणून कार्यरत आहे, तर याच ज्ञानाच्या जोरावर तिने थेट ‘कौन बनेगा करोडपती’च्या हॉट सीटवर बसून संपूर्ण वैदर्भाचा अभिमान वाढविला. गरीब कुटुंबात जन्मलेली स्नेहलची परिस्थिती खडतर होती. पण तिच्या आईने शिक्षणाला कधीही तडा जाऊ दिला नाही. गावात शिकविण्या घेऊन दोन मुलींना उभं करण्याचं अवघड काम आईने समर्थपणे पार पाडलं. आज धाकटी मुलगी वेदिका सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे, तर स्नेहल महसूल खात्यात ‘तलाठी’ म्हणून काम करते. आई-मुलींचा हा संघर्षमय प्रवास खरंच ‘त्रिशक्तीचा जागर’ आहे. दि. 25 सप्टेंबर रोजी स्नेहल थेट अमिताभ बच्चनसमोर केबीसीच्या हॉट सीटवर विराजमान झाली. सुरुवातीला उत्तम खेळ करत तिने साडेबारा लाखांपर्यंत मजल मारली. 25 लाखांच्या प्रश्नात धोका पत्करल्याने बक्षीस पाच लाखांवर आले. पण तिच्या चेहर्यावर खंत नव्हती. उलट, स्वतः बिग बीसमोर बसणं, त्यांचं कौतुक मिळणं हेच आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहेत. या प्रोत्साहनामुळे कलेक्टर होण्याच्या स्वप्नाला बळ मिळालं, असं ती सांगते. ओझ्याखाली दबलेल्या कुटुंबाला यामुळे दिलासा मिळाला. स्नेहलचा हा संघर्षमय प्रवास प्रत्येक महिलेला प्रेरणा देणारा आहे.

संबंधित बातम्या

Back to top button