इंधन दरवाढीच्या अफवेने शहरात धावपळ
विनाकारण ’टाकी फुल’ करण्यासाठी पेट्रोल पंपांवर गर्दी

इराण इस्रायल युद्धाच्या नावाखाली अफवांचे पीक व्हायरल
अमरावती / 5 मार्च – इराण आणि इस्रायलमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारपेठेत कच्चे तेल महागल्याची आणि भारतात पेट्रोल-डिझेलचे दर 3 मार्चच्या मध्यरात्रीपासून 10 रुपयांनी वाढणार असल्याची एक खोटी अफवा अमरावतीत वणव्यासारखी पसरली. या एका बातमीने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडवून दिली. रात्रीपासूनच वाहनधारकांनी इंधन भरण्यासाठी पंपांवर लांबच लांब रांगा लावल्या. होळीचा सण साजरा करून घरी विसावलेले नागरिकही संभाव्य दरवाढीच्या धास्तीने मध्यरात्री वाहने घेऊन रस्त्यावर उतरले. प्रशासनाने ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले असले तरी, नागरिकांची धावपळ थांबताना दिसत नव्हती.
समाजमाध्यमांवर एका पाठोपाठ एक येणार्या संदेशांनी या आगीत तेल ओतण्याचे काम केले. इर्विन चौक, नवसारी, मोर्शी रस्ता यासह शहरातील सर्वच प्रमुख भागांतील पेट्रोल पंपांवर दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र बुधवारी सायंकाळपर्यंत पाहायला मिळाले. अमरावती जिल्हा पेट्रोल विक्रेता संघटनेने तातडीने स्पष्टीकरण देऊन जिल्ह्यात पुढील 4 ते 5 महिने पुरेल इतका पुरेसा इंधन साठा उपलब्ध असल्याचे जाहीर केले. सध्या अमरावतीत पेट्रोल 105 रुपये 11 पैसे आणि डिझेल 91 रुपये 65 पैसे प्रतिलिटर दराने विकले जात असून, नजीकच्या काळात कोणतीही दरवाढ प्रस्तावित नसल्याचे प्रशासनाने ठामपणे सांगितले आहे. इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध-जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा साठा पुरेसा असून टंचाई निर्माण होण्याचा प्रश्नच नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी केले आहे. तसेच जिल्हा पेट्रोल विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सौरभ जगताप यांनी स्पष्ट केले की, जागतिक बाजारपेठेत किमती वाढल्या तरी स्थानिक स्तरावर दरवाढीची शक्यता नाही. सर्व पंप नियमित सुरू राहतील.




