परतवाड्यात बिल्डर जानराव डहाकेंच्या घरावर दरोडा

तिघांनी चाकूच्या बळावर लाखोंचा ऐवज लुटला

-हल्ल्यात डहाके जखमी, शहरात खळबळ
-रोकड व सोन्या-चांदीचे दागीणे लंपास
-नारायणपूर मार्गावर मध्यरात्रीची घटना
अमरावती / 3 जुलै: अमरावती जिल्ह्यात बांधकाम व्यवसायात ख्यातनाम असलेले परतवाडा येथील रहिवासी जानराव डहाके यांच्या घरावर तीघांनी चाकूच्या धाकावर दरोडा टाकून लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना बुधवारी, मध्यरात्री दोन ते अडिच वाजताच्या सुमारस घडली. या घटनेने अचलपूर-पतरवाडा शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. यावेळी जानराव डहाके यांनी विरोध केला असता दरोडेखोरांनी त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यात डहाके यांना गंभीर दुखापत झाली.
मुळ अचलपूर शहरातील रहिवासी असलेल्या जानराव डहाके यांनी काही वर्षांपूर्वी परतवाडानजीक नारायणपूर मार्गावर विश्वकर्मा कॉलनीत एक आलीशान घर बांधले आहे. येथे जानराव डहाके आपल्या पत्नीसमवेत राहतात. 2 जुलैच्या मध्यरात्री पती-पत्नी घरात झोपले असताना त्यांना दोन ते अडिच वाजताच्या दरम्यान घरात कशाचातरी आवाज आल्याने ते जागे झाले. आपल्या खोलीतून बाहेर आले असता त्यांना घरात तीन युवक शिरले असल्याचे दिसले. त्यांनी आपले चेहरे कपड्याने झाकले होते. त्यांना पाहताच डहाके दांपत्याने आरडाओरड केली मात्र दरोडेखोरांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून शांत राहण्यास भाग पाडले. घरातील रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागीणे व किंमती वस्तू आपल्या हवाली करण्याचे फर्मान त्यांनी सोडले.
यावेळी जानराव डहाके यांनी दरोडेखोरांना विरोध करण्याचा प्रयत्न केला असता एकाने धारदार चाकूने त्यांच्या हातावर जोरदार वार केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. नंतर जीवाच्या भीतीने या दांपत्याने दरोडेखोरांसमोर शरणागती पत्करली. डहाके यांच्या पत्नीने त्यांचे हातपाय जोडून जे पाहीजे ते घेउन जा पण आम्हाला मारु नका अशी विनंती त्यांना केली. त्यानंतर दरोडेखोरांनी घरातील सर्व आलमार्‍या उघडून सोन्या-चांदीचे दागीणे आणि रोख रक्कम आपल्या ताब्यात घेतली आणि घराबाहेर पडून पळ काढला. पळून जाण्यापूर्वी दरोडेखोरांनी डहाके पती-पत्नीला आरडाओरड न करता घरातच शांत राहण्याची धमकी दिली.
या घटनेने पूरते हादरुन गेलेले डहाके दांपत्य नंतर रात्रभर घराबाहेर पडलेच नाही. सकाळ झाल्यानंतर हे दोघेही घराबाहेर पडले आणि त्यांनी थेट परतवाडा पोलिस स्टेशन गाठले व संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. दरोडेखोरांनी आपल्या घरातून 1 लाख 10 हजार रुपये रोख, 90 ग्राम सोन्याचे दागीणे आणि 200 ग्राम चांदीचे दागीणे असा सुमारे 12 ते 15 लाख रुपयांचा ऐवज लुटून नेल्याचे जानराव डहाके यांनी सांगितले. घटनेची माहिती वार्‍यासारखी अचलपूर आणि परतवाडा शहरात पसरल्यानंतर खळबळ उडाली. या घटनेमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. पोलिनसांनी घटनास्थळी भेट देवून तपासाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी ठसेतज्ञ आणि श्वान पथकाची मदत घेतली.
-आरोपी हिंदीभाषिक व 30 ते 32 वयोगटातील
संपूर्ण घटनाक्रम जानराव डहाके यांनी पोलिसांसमक्ष कथन केला. तिन्ही दरोडेखोर हे 30 ते 32 वयोगटातील तरुण होते. ते आपसात तसेच आमच्याशी हिंदी भाषेत संभाषण करित होते. त्यापैकी दोघेजण आम्हाला परिचित नसलेल्या अन्य भाषेतही बोलत होते, असे डहाके यांनी सांगितले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात सराईत टोळीचा हात असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. अशा गुन्हेगारी टोळींवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. आरोपींनी आधी परिसराची रेकी केली असावी आणि नंतर डहाके यांच्या घराला लक्ष्य केले असावे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

संबंधित बातम्या

Back to top button