आज मनपाच्या 87 जागांसाठी आरक्षण सोडत
इच्छुक उमेदवारांची धडधड वाढली

* आंबेडकर सभागृहात आयोजन
अमरावती /10 नोव्हेंबर – अमरावती महानगरपालिकेच्या 87 जागांसाठी होणार्या आरक्षण लॉटरीचा सोहळा आज, 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडणार आहे. या सोहळ्याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून, इच्छुक उमेदवारांच्या धडधडींना वेग आला आहे. महानगरपालिकेच्या जानेवारी महिन्यात अपेक्षित सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीचा हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. अनुसूचित जात, अनुसूचित जमात, इतर मागासवर्गीय आणि महिला अशा विविध प्रवर्गांसाठी आरक्षणाचे निर्धारण या लॉटरीतून होणार आहे. मनपाच्या निवडणूक विभागाच्या माहितीनुसार, 15 अधिकारी आरक्षण लॉटरी प्रक्रियेसाठी नेमण्यात आले आहेत. तसेच मनपा शाळांतील पाच चिमुकले विद्यार्थी भाग्यवान चिठ्ठ्या काढणार आहेत. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष राहावी यासाठी प्रशासन सज्ज आहे. या सोहळ्याला सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, आंबेडकर सभागृह आजचा दिवस शहराच्या राजकीय वर्तुळाचे केंद्र ठरणार आहे.




