बेकायदेशिर केबल्स काढा; अन्यथा कठोर कारवाई
महापालिकेचा सात दिवसांचा अल्टीमेटम

-सार्वजनिक सुरक्षेसाठी ठाम भूमिका
-धोकादायक ठरत आहेत फायबर वायर
-शहराच्या सौंदर्यिकरणावरही डाग
अमरावती / 15 सप्टेंबर : शहरातील पदपथांवर आणि रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणावर अनधिकृतरीत्या टाकलेल्या ऑपटिकल फायबर केबल्समुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आहेच, पण त्याचबरोबर पादचार्यांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. या धोकादायक आणि बेशिस्त पद्धतीच्या कामकाजाविरुद्ध अमरावती महानगरपालिकेने आता कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व संबंधित कंपन्या व सेवा पुरवठादारांना तात्काळ केबल्स काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले असून, अन्यथा थेट कारवाई करण्याचा इशारा स्पष्ट शब्दांत दिला गेला आहे.
महानगरपालिकेच्या वतीने प्रसिद्ध झालेल्या पत्रकात म्हटले आहे की, रस्त्यांच्या कडेला अनियंत्रित पद्धतीने टाकलेल्या या केबल्समुळे नागरिकांना चालणे अवघड होते. अनेक ठिकाणी सरळसोट पावसाचे पाणीही अडवले जाते आणि आपत्कालीन परिस्थितीत धोकाही वाढतो. शिवाय या केबल्समुळे शहराच्या सौंदर्यावर कुरुप टाच बसत असल्याचेही पालिकेने निदर्शनास आणले आहे.
पालिका प्रशासनाने या मोहिमेला सार्वजनिक सुरक्षेचे ध्येय अधोरेखित करत प्राधान्य दिले आहे. केबलद्वारे सेवा पुरवणार्या कंपन्यांकडून शहराच्या पायाभूत सुविधांचा गैरवापर होत असल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. नागरिकांना सुरक्षित आणि सुस्थितीत पदपथ उपलब्ध करून देणे ही पालिकेची जबाबदारी असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले असून, मुदतीत कारवाई निश्चित होणार असल्याचे संकेत दिले आहेत. नगरिकांतूनही अनेकदा अशा अनधिकृत केबल्सबाबत तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर पालिकेकडून आलेली ही कठोर भूमिका राबविण्यात येणार असल्याने सात दिवसांत शहराच्या पदपथांवरून हा केबलजाळा गायब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-संबंधितांकडून दंड वसुलणार
याबाबत महापालिकेने संबंधितांना नोटिस बजावली आहे. पालिकेचे आदेश स्पष्ट आहेत की, सात दिवसांच्या आत केबल्स स्वतःहून काढावेत. जर सूचनांचे पालन झाले नाही, तर पालिकेचे पथक कार्यवाहीला उतरेल आणि केबल्स उखडून टाकेल. याचा संपूर्ण खर्च, तसेच अतिरिक्त दंडही संबंधित कंपन्या किंवा संस्थांकडून वसूल केला जाईल, असा इशारा नोटिशीत देण्यात आला आहे.




