गॅस टंचाईमुळे धार्मिक ’अन्नछत्र’ अडचणीत

एकविरा देवी, दत्त मंदिर आणि गुरुद्वारासमोर इंधनाचे संकट

अमरावती /12 मार्च अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरात इंधनाचे संकट ओढवले आहे. युद्धाच्या झळा आता आखाती देशांतून थेट भारतातील धार्मिक आणि सामाजिक कार्यापर्यंत पोहोचल्या असून, भाविकांसाठी चालविल्या जाणार्‍या ’अन्नछत्रां’समोर मोठे आव्हान उभे ठाकेले आहे.
हिंदू धर्म परंपरेनुसार अन्नदान हे सर्वात पवित्र दान मानले जाते, त्यामुळे अनेक मंदिरांत वर्षभर अल्प दरात किंवा पूर्णतः मोफत महाप्रसादाचे नियोजन असते. मात्र, गॅस सिलिंडरच्या संभाव्य तुटवड्यामुळे या परंपरेत अडथळे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमरावती येथील श्री एकविरा देवी मंदिरात दररोज साधारणतः 1000 ते 1200 भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. या स्वयंपाकघरासाठी महिन्याकाठी जवळपास 200 गॅस सिलिंडर लागतात. गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यास महाप्रसादातील पदार्थांची संख्या कमी करावी लागेल किंवा सरपण (लाकूड) या पर्यायी इंधनाचा विचार करावा लागेल, असे संकेत विश्वस्त मंडळाकडून मिळत आहेत. तसेच, बडनेरा येथील दत्त मंदिर (झिरी) येथेही भाविकांच्या शाश्वत पूजा आणि रोजच्या अन्नप्रसादासाठी मोठ्या प्रमाणात गॅसचा वापर होतो. या संस्थानासमोरही आता इंधन टंचाईचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. केवळ हिंदू मंदिरेच नव्हे, तर शीख समुदायातील ’लंगर’ आणि महानुभाव पंथातील पंगतींवरही याचा परिणाम होताना दिसत आहे. गुरुद्वारांमध्ये कोणत्याही भेदभावाशिवाय दिले जाणारे मोफत गरम शाकाहारी भोजन तयार करण्यासाठी आता इंधनाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. महानुभाव पंथाच्या आश्रमांमध्ये महंत आणि भाविकांच्या निवासाची व भोजनाची स्वतंत्र व्यवस्था असते, त्यांनाही आता गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे पर्यायी इंधनाचा विचार करावा लागणार आहे. जागतिक स्तरावरील युद्धामुळे निर्माण झालेली ही टंचाई आता थेट देवस्थानच्या अन्नछत्रांपर्यंत पोहोचली असून, प्रसादाची ही अखंड परंपरा चालू ठेवण्यासाठी व्यवस्थापनाची मोठी ओढाताण होणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button