रणदीप हुड्डा-नवनीत राणा यांचा दहीहंडी उत्सवात ठेका

गळ्यात भगवा शेला घालून डान्स, चाहत्यांचा जल्लोष

सावरकरांच्या ओळींनी भारावले वातावरण
अमरावती/ 17 ऑगस्ट : शहरातील नवाथे चौक परिसरात रविवारी सायंकाळी झालेल्या दहीहंडी उत्सवात बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची रंगत चढली. भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने आयोजित या दहीहंडीला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार रवी राणा, माजी खासदार नवनीत राणा, केवलराम काळे, प्रवीण तायडे यांच्यासह भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी रणदीप हुड्डा यांनी गळ्यात भगवा शेला परिधान करून माजी खासदार नवनीत राणा यांच्यासह मंचावर नृत्य सादर केले. त्यांच्या या खास अंदाजाने उपस्थितांची मने जिंकली. रणदीप व्यासपीठावर येताच चाहत्यांनी एकच जल्लोष केला. रणदीप यांनी आपल्या भाषणात अमरावतीत येऊन खूप आनंद झाल्याचे सांगितले. ‘ने मजसी ने परत मातृभूमीला…’ या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ओळी त्यांनी सादर केल्या. त्यानंतर आपल्या जाट या चित्रपटातील मुझे मेरा नाम बहोत पसंत है – राणा तुंगा हा डायलॉग म्हणत थेट चाहत्यांशी संवाद साधला. या क्षणी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला प्रसिद्ध मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव याचीही विशेष उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला उपस्थित वर्धा येथील अजय मोहिते यांनी दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुन यांच्या पुष्पा चित्रपटातील संवाद सादर करून वातावरण अधिकच रंगतदार केले. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यक्रमाला संबोधित करताना ही दहीहंडी स्पर्धा ‘ऑपरेशन सिंदूर’ला समर्पित असल्याचे ऐकून अभिमान वाटतो, असे सांगितले. ते पुढे म्हणाले, अमरावती शहर झपाट्याने प्रगतीच्या मार्गावर आहे. येथून मुंबईसाठी थेट विमानसेवा सुरू झाली आहे. लवकरच देशातील इतर महत्वाच्या शहरांशीही अमरावतीचे हवाई संपर्क प्रस्थापित होतील. पुण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाली असून त्याचा लाभ अमरावतीकरांना मिळत आहे.
बावनकुळे यांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या पुढाकारातून शहरानजीक हनुमान गढी येथे उभारण्यात आलेल्या 111 फूट उंचीच्या हनुमान मूर्तीचा विशेष उल्लेख केला. त्याच परिसरात पाच कोटी रुपये खर्चून रामवाटिका येथे टॉय ट्रेन सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांत अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतजमिनी आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची तत्काळ पंचनामे करून शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. या उत्सवाला भाजप व युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते तसेच रणदीप हुड्डा यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रणदीप यांच्या खास ठेक्यामुळे आणि सावरकरांच्या ओळींमुळे दहीहंडी उत्सव संस्मरणीय ठरला.

संबंधित बातम्या

Back to top button