राजमाता जिजाऊंचा वारसा म्हणजे मातृत्वातून राष्ट्रनिर्मिती

आ.सुलभाताई खोडके यांचे प्रतिपादन

अमरावती /12 जानेवारी – महाराष्ट्राच्या मातीला शौर्याचा, त्यागाचा आणि स्वाभिमानाचा एक अलौकिक सुगंध आहे. या सुगंधाचा उगम ज्या महान माऊलीच्या संस्कारातून झाला, त्या म्हणजे राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ माँसाहेब. जिजाऊ केवळ एका महान राजाची माता नव्हती, तर ती एका संपूर्ण युगाची निर्माती आणि हिंदवी स्वराज्याची शिल्पकार होती.
मातृत्वाचे असे ओजस्वी आणि तेजस्वी रूप इतिहासात अन्यत्र कुठेही पाहायला मिळत नाही. आजच्या काळात जेव्हा आपण ’ आदर्श माता ’ किंवा ’ आदर्श मार्गदर्शक शोधतो, तेव्हा माँ जिजाऊंचे स्मरण होणे अनिवार्य आहे.केवळ प्रेम करणे म्हणजे मातृत्व नव्हे, तर आपल्या मुलाला समाजासाठी, राष्ट्रासाठी आणि सत्यासाठी उभे करणे म्हणजे खरे मातृत्व, हा धडा माँ जिजाऊंनी जगाला दिला. आजही प्रत्येक मराठी मनात आणि प्रत्येक कर्तृत्ववान आईच्या रूपात जिजाऊंचे अस्तित्व कायम आहे. त्या खर्‍या अर्थाने स्वराज्याच्या आधारस्तंभ होत्या.इतिहासातील काही व्यक्तिमत्वे केवळ एका काळापूरती मर्यादित राहत नाहीत, ती पिढ्यानपिढ्या समाजमन घडवत राहतात. राजमाता जिजाऊ हे असेच कालातीत व्यक्तिमत्व आहे.
त्या केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदात्या माता नव्हत्या, तर त्या स्वराज्याच्या संकल्पनेच्या पहिल्या शिल्पकार होत्या. त्यांच्या विचारांतून, निर्णयायांतून आणि कृतीतून जे समाजभान प्रकट झाले ते आजही तितकेच तेजस्वी, प्रेरणादायी आणि आदर्श आहे.राजमाता माँ जिजाऊंनी एक सुसंस्कृत, न्यायप्रिय आणि लोकाभिमुख प्रशासनाची पायाभरणी केली. असे प्रतिपादन आमदार – सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी उपस्थितांना संबोधून केले. सोमवार दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी आरटीओ परिसर समीपस्थ राजमाता – राष्ट्रमाता माँ जिजाऊ चौक येथे राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा निमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. राष्ट्रमाता – राजमाता जिजाऊ वंदनेने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. सर्वप्रथम राष्ट्रनिर्मितीच्या संस्काराची शिदोरी देणार्‍या व छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणार्‍या थोर कल्याणकारी लोकमातेच्या प्रतिमेस आमदार – सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी नमन – पूजन – वंदन – माल्यार्पण करीत विनम्र अभिवादन केले.स्वतःच्या पाल्याविषयी ठाम विचार ठेवणे, अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे बळ निर्माण करणे, मुलामध्ये आत्मविश्वास, शिस्त आणि मूल्य रुजविणे ही राष्ट्रमाता – राजमाता जिजाऊंची शिकवण आजही तितकीच कालसुसंगत आहे. स्वराज्य स्थापन करताना अनेक दुःख त्या मातेने सोसले. तरीही सामान्य जनतेच्या हक्काचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी त्यांनी त्यांनी शिवबाला सदोदित प्रेरित केले. स्त्रियांच्या सन्मानासाठी त्या झटत राहिल्या. त्या सज्जनांचा आधार आणि दुर्जनांचा कर्दनकाळ होत्या. सईबाईंच्या अकाली निधनानंतर शंभूराजांना त्यांनी मायेचा आधार दिला. संभाजी राजांना त्यांनी घडवले.

संबंधित बातम्या

Back to top button