राजकमलचा रेल्वे उड्डाणपूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद
मध्यरात्रीपासून अंमलबजावणी, पादचार्यांनाही मज्जाव

-शहरातील वाहतुकीवर होणार मोठा परिणाम
अमरावती / 24 ऑगस्ट : शहरवासीयांची जीवनवाहिनी असलेला अमरावतीच्या मध्यवर्ती राजकमल चौकातील रेल्वे उड्डाणपूल आता अत्यंत धोकादायक ठरल्याने अखेर बंद करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूचनेनुसार, हा पूल आज 24 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12 वाजल्यापासून सर्वप्रकारच्या वाहनांसाठी आणि पादचार्यांसाठीही बंद करण्यात आला आहे. अमरावती पोलिस आयुक्तालयाच्या जनसंपर्क विभागाने याबाबत पत्रक जारी करुन माहिती दिली आहे.
हा उड्डाणपूल सन 1969 मध्ये तत्कालीन वाढत्या वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन उभारण्यात आला होता. गेल्या सहा दशकांत त्याने लाखो वाहनांचा भार सांभाळत शहराला मोठी सेवा दिली. मात्र आता पुलाच्या काँक्रीटमध्ये आणि लोखंडी संरचनेत झीज झाल्याने तो धोकादायक ठरला आहे. काही महिन्यांपूर्वीच येथे जड वाहनांची वाहतूक थांबविण्यात आली होती. अखेर प्राप्त झालेल्या तांत्रिक अहवालानुसार पादचारी हालचालदेखील धोकादायक ठरू शकते, अशी नोंद झाल्याने हा कडक निर्णय घेण्यात आला.
राजकमल चौक हा अमरावतीच्या हृदयस्थानी असलेला प्रमुख चौक आहे. येथून जयस्तंभ चौक, रेल्वे स्टेशन चौक आणि हमालपुरा परिसराशी या पुलाद्वारे थेट जोडणी होते. या पुलामुळे मोठ्या प्रमाणावर दररोजची वाहतूक सुलभ होत होती. आता पूल बंद झाल्यामुळे शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे. पोलीस प्रशासनाने पर्यायी मार्गांचा तातडीने आराखडा तयार करून फलक, मार्गदर्शक चिन्हे बसवण्याचे काम सुरू केले आहे. सदर पुल आता तोडून त्याऐवजी नवा व आधुनिक उड्डाणपूल उभारण्याची गरज आहे. यासाठी शासकीय स्तरावर प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवला जाण्याची शक्यता आहे. दुरुस्तीपेक्षा नव्या पुलाचा पर्याय जास्त सुरक्षित ठरेल, असे अभियंते सांगत आहेत. पूल तात्काळ बंद करण्यात आला असल्यामुळे नागरिकांनी पूल परिसरात गर्दी न करता पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.




