दोन वर्षात होणार राजकमल उड्डाणपूलाचे पुनर्निमाण
चार महिन्यांत मंजुरीची पूर्तता

-खोडके दांपत्याच्या पुढाकाराने प्रक्रिया गतीमान
-जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वाची बैठक
अमरावती / 28 ऑगस्ट : शहरातील सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा राजकमल चौक ते रेल्वे स्टेशन मार्गावरील रेल्वे उड्डाणपुल बंद झाल्याने अमरावतीकरांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सुलभा खोडके व विधानपरिषद सदस्य संजय खोडके यांच्या पुढाकाराने जिलाधिकारी कार्यालयात उच्चस्तरीय बैठक घेऊन उड्डाणपुलाच्या पुनर्निर्माणाच्या आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत हे स्पष्ट करण्यात आले की, विद्यमान उड्डाणपुल तातडीने तोडण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू करण्यात आली नसली तरी पुढील चार महिन्यांत केंद्र, राज्य आणि रेल्वे विभागाकडून मंजुरी घेऊन ही प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. त्यानंतर पुलाचा नकाशा तयार करून निधी मंजूर केला जाईल. टेंडर पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षांत नवा उड्डाणपुल उभारला जाणार आहे. याचा अर्थ पुढील दोन-तीन वर्षे नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागेल.
सध्या उड्डाणपुल बंद झाल्यामुळे शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे खोडके दांपत्याने मनपा, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक शाखा व पोलिसांना बोलावून नागरिकांसाठी पर्यायी रस्ते सुकर करण्याचे निर्देश दिले. जयस्तंभ चौकाजवळील सामरा शोरूममार्गे नेहरू मैदानाकडे जाणारा रस्ता खुला करण्याची शक्यता तपासण्यात आली. तसेच बस स्थानक, समाधान नगर, ज्ञानमाता शाळा रस्ता, उस्मानिया मशिदीमागील जोडरस्ता व रेल्वे स्टेशन-बेलपूरा-राजापेठ अंडरपास मार्ग दुरुस्त करून खुला करण्याचेही प्रस्ताव बैठकीत ठेवण्यात आले. जिलाधिकारी आशिष येरेकर यांनी या सर्व प्रस्तावांना तत्त्वतः मान्यता दिली आहे.
दरम्यान, उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंच्या बॅरिकेटिंगच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाच फूट उंचीच्या भिंती उभारण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने पुलावर अनधिकृत वावर होऊ नये हा उद्देश आहे. बैठकीस जिलाधिकारी आशिष येरेकर, मनपा आयुक्त सौम्या शर्मा, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त मेघना वासनकर, निवासी उपजिलाधिकारी अनिल भटकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रतिक गिरी, शहर अभियंता रवींद्र पवार, वाहतूक विभागाचे एसीपी संजय खताळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
खोडके दांपत्यांनी या वेळी स्पष्ट केले की, अमरावती शहराचा व्यापारी भाग, तहसील कार्यालय व प्रमुख शासकीय कार्यालये उड्डाणपुलाच्या परिसरात असल्याने त्याचे महत्त्व फार मोठे आहे. पुल बंद झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पर्यायी मार्ग खुला करून त्यांची दुरुस्ती करावी. तसेच राज्य सरकारकडील निधी त्वरीत मंजूर करून नवा उड्डाणपुल लवकर उभारण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला.
-पर्यायी रस्त्यांचे तातडीने व्यवस्थापन
पर्यायी रस्त्यांवर तातडीने दुरुस्ती व व्यवस्थापन करावे, जयस्तंभ चौकाजवळील नेहरू मैदानमार्गे रस्ता खुला करावा, बस स्थानक-ज्ञानमाता शाळा मार्ग वाहतुकीसाठी वापरावा, राजापेठ अंडरपासकडे जाणार्या रस्त्याची दुरुस्ती त्वरित करावी, अशा ठाम सुचना सुलभा खोडके व संजय खोडके यांनी प्रशासनाला दिल्या. पुल बांधणीसाठी राज्य सरकारकडील निधी मंजुरी लवकर मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहणार
-जिल्हाधिकार्यांकडून आदेश
खोडके दांपत्याने केलेल्या सुचनांना जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी मान्यता देऊन कामे त्वरीत सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. उड्डाणपुल तोडणी व नव्या पुलाच्या बांधकामासाठी प्रक्रिया लगेच सुरु करण्यात येणार आहे. केंद्र, राज्य व रेल्वे विभागाची मंजुरी घेण्यासाठी किमान 4 महिने लागणार आहेत. मंजुरीनंतर नव्या उड्डाणपुलाचा नकाशा व आराखडा तयार केला जाईल. राज्य व केंद्र सरकारकडून निधी मंजूर करण्यात आल्यानंतर कामासाठी कंत्राटी प्रक्रिया पूर्ण केली जाईल. टेंडरनंतर अंदाजे 2 वर्षांत नवे पुलाचे काम पूर्ण होउ शकेल. पुल बांधणीसाठी राज्य सरकारकडील निधी मंजुरी लवकर मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा निर्धार सुलभा खोडके आणि संजय खोडके यांनी केला आहे.




