राजकमल उड्डाणपूल : बांधकाम विभागाने भूमिका स्पष्ट करावी

युवक काँग्रेसची मागणी, कार्यकारी अभियंत्यांना घेराव

अमरावती / 15 सप्टेंबर  : अमरावती शहराच्या मध्यवर्ती भागातील राजकमल रेल्वे उड्डाणपूल बंद झाल्यामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. नागरिकांना होणारा मनस्ताप लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने या उड्डाणपूल दुरुस्ती व पुनर्बांधणीबाबत तातडीने भूमिका स्पष्ट करावी, या ठाम मागणीसाठी युवक काँग्रेसने सोमवारी 15 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता अमरावती येथील बाधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक देवून कार्यकारी अभियंत्यांना घेराव घातला आणि त्यांना निवेदन सादर केले.
राजकमल उड्डाणपूल बंद असल्याने दररोज हजारो वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शालेय वाहने, रुग्णवाहिका, कामावर जाणारे कर्मचारी यांना प्रचंड मनस्ताप होत असून, शहरातील मुख्य रस्त्यांवर तासन्तास वाहतूक कोंडी होते. पर्यायी मार्गांवरही दाटीवाटीची परिस्थिती निर्माण होत आहे. नागरिकांच्या संयमाचा अंत होत असून प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची मागणी दिवसेंदिवस तीव्र होत आहे.
युवक काँग्रेसने याआधीच इशारा दिल्याप्रमाणे सोमवारी सकाळी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात सार्वजनिक बांधकाम विभागाने भूमिका स्पष्ट करून उड्डाणपूल दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी ठोस मुदत जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यामध्ये मुन्ना राठोड, समीर जवंजाळ, वैभव देशमुख, आशिष यादव, अक्षय साबळे, सागर कलाने, निखिल बिजवे, चैतन्य गायकवाड, शुभम बांबल, आकाश धुराटकर, निशांत देशमुख, साहिल वानरे, अभिषेक भोसले, कृणाल गावंडे, निलेश देशमुख, धनंजय बोबडे, सम्यक वाकोडे, शुभम हिवसे, कौस्तुभ देशमुख, मोहित भेंडे, संकेत भेंडे, केदार भेंडे यांचा समावेश होता.
युवक काँग्रेस पदाधिकार्‍यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले की, सार्वजनिक बांधकाम विभागाने राजकमल उड्डाणपूलाबाबत भूमिका तातडीने जाहीर केली नाही तर शहरात मोठ्या प्रमाणावर तीव्र आंदोलन उभारले जाईल. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित या प्रश्नावर दुर्लक्ष सहन केले जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला.

संबंधित बातम्या

Back to top button