राजकमलचा पूल बंद – अमरावतीत भीषण वाहतूक कोंडी
पर्यायी मार्गांचा अभाव; नागरिकांमध्ये नाराजी

-अचानक निर्णय, रुग्णवाहिकादेखील अडकून पडल्या
-नोकरदार, व्यावसायिक व विद्यार्थ्यांचे हाल
अमरावती / 25 ऑगस्ट : शहरातील सर्वात वर्दळीच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या राजकमल चौकातील रेल्वे उड्डाणपूल रविवारी मध्यरात्रीपासून पूर्णपणे बंद करण्यात आला. यामुळे सोमवारी सकाळपासून अमरावतीत वाहतूक व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले. दुपारी इर्विन चौक, मालवीय चौक, जयस्तंभ चौक व राजकमल परिसरात वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या. गाड्यांची सततची वर्दळ असल्याने सामान्य नागरिकांसह रुग्णवाहिकादेखील तासन्तास अडकून राहिल्या.
अमरावतीकर सोमवारी सकाळी कामानिमित्त बाहेर पडले तेव्हा राजकमल पूल बंद असल्याची माहिती त्यांना थेट रस्त्यात मिळाली, कारण पर्यायी मार्गांची जाहिरात वा पुरेशी सूचना प्रशासनाने केली नव्हती. सरकारी अधिकारी आपल्या सोयीसाठी अचानक आदेश देतात, पण सामान्यांचा विचार कुणाला आठवतो का? असा सवाल करणारे वाहनचालक संताप व्यक्त करताना दिसले. विद्यार्थ्यांना कॉलेजला आणि कामगारांना वेळेत नोकरीवर पोहोचता आले नाही. व्यावसायिकांनीही माल पोहोचवण्यात अडथळे आल्याचे स्पष्ट केले.
पूल सध्याच्या अवस्थेत वापरणे धोकादायक होते. आम्ही रेल्वे आणि महानगरपालिकेशी संपर्क साधून नवा पूल उभारण्याच्या प्रक्रियेवर लवकरच निर्णय घेऊ. तोपर्यंत नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे, असे प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे. हा पूल 1963 मध्ये बांधण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकतेच केलेल्या संरचनात्मक लेखापरीक्षणात (स्ट्रक्चरल ऑडिट) पूल गंभीर स्थितीत असल्याचे नमूद केले. अहवालानुसार, स्टील गर्डर्सला जंग लागू लागले आहे, डेक स्लॅबला भेगा पडल्या आहेत, अब्टमेंटमध्ये गळती वाढली आहे. या तांत्रिक कारणांमुळे पूल केव्हाही कोसळण्याचा धोका असल्याचे जाणवून आले आणि प्रशासनाने सर्वांसाठी तो बंद करणे अपरिहार्य ठरले, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे.
-250 कोटींची मागणी
रेल्वे स्टेशन चौकातून राजकमल चौक, जयस्तंभ चौक, हमालपुरा अशा विविध मार्गाना हा पुल जोडतो. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी नवीन उड्डाणपूल निर्माण करण्याची गरज असल्याची बाब खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना लक्षात आणून दिली. बोंडे यांनी या संदर्भातील निवेदन नुकतेच अश्विनी वैष्णव यांना दिले. या ठिकाणी प्रशस्त असा भव्य उड्डाणपूल उभारल्यास वाहतुकीची समस्या कायमस्वरूपी सुटेल त्यासाठी रेल्वे विभागाने 250 कोटी रुपयांचा निधी द्यावा अशी मागणी देखील केली.
त्यावर वैष्णव यांनी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना रेल्वे विभागाच्या प्रधान सचिवांना दिल्या आहेत. नवीन पुलाची उभारणी होणार असल्याने हा पूल आता इतिहासजमा होणार आहे, पण तोपर्यंत नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे.
-पुढील काळात मोठे आव्हान
अमरावती शहरातील पूर्व व पश्चिम भागाला जोडणारे तीन प्रमुख पूल आहेत – त्यापैकी राजकमल पूल बंद झाल्याने आता फक्त दोन पूलांवर ताण वाढला आहे. त्यामुळे पुढील काही काळ वाहतूक कोंडी हा नित्याचा अनुभव ठरण्याची शक्यता आहे. त्यात प्रशासनाची व प्रामुख्याने पोलिस विभागाची दमछाक होणार आहे.
-वाहतूक पोलिस हतबल
आज गोंधळ उडून वाहतूक कोंडी इतकी विक्राळ झाली की वाहतूक पोलिसांचे सर्व प्रयत्न अपुरे ठरले. काही ठिकाणी रुग्णवाहिकांना वाट काढण्यासाठी नागरिकांनीच प्रत्यक्ष हातभार लावला. गाड्यांच्या एवढ्या लांब रांगा लागल्या होत्या क, जयस्तंभ चौक ते नागपूर नाका रस्त्यावर गाड्या हलायलाच तासभराचा वेळ लागत होता.
-काम त्वरित सुरु करण्याची मागणी
नागरिक आता प्रशासनाला प्रश्न विचारत आहेत. पूल बंद करण्यापूर्वी पर्यायी पूल का उभारला गेला नाही?, दैनंदिन प्रवास करणार्यांना हाल किती दिवस सहन करावे लागणार?, पूल बंद करणे सुरक्षिततेसाठी योग्य आहे, पण पर्याय न दिल्यामुळेच आम्हाला प्रदीर्घ कोंडीचा सामना करावा लागणार आहे. अशा शब्दांत नागरिक रोष व्यक्त करित आहेत. प्रशासनाने त्वरित योजना आखावी आणि नवीन पुलाचे काम तातडीने सुरु करावे, अशी मागणी स्थानिक व्यापार्यांनी केली.




