राजापेठ ते बडनेरा : सौंदर्यीकरणासाठी आयुक्तांचा पाहणी दौरा

ऐतिहासिक, सांस्कृतिक ठिकाणांना आधुनिक साज

-कामांची गुणवत्ता आणि वेळेची शिस्त महत्त्वाची
-सौम्या शर्मा चांडक यांचा स्पष्ट इशारा
अमरावती / 29 जुलै : अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज शहरातील सौंदर्यीकरण कामांना गती देण्यासाठी राजापेठ, दस्तुरनगर, नवाथे चौक, फर्शी स्टॉप, अलमास नगर, समता चौक, आठवडी बाजार व बडनेरा परिसराचा सविस्तर दौरा केला. या दौर्‍यात त्यांनी कामांची पाहणी करत संबंधित अधिकार्‍यांना स्पष्ट सूचना दिल्या. काम वेळेत आणि दर्जेदार हवंच! असे त्यांनी सांगितले.
सदर ठिकाणी रस्ते, फूटपाथ, दिवाबत्ती, बागा, सार्वजनिक शौचालये, पुतळे आणि स्मारकांचे सौंदर्यीकरण सुरू असून, यासाठी टिकाऊ व दर्जेदार साहित्य वापरण्यावर भर देण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. सौंदर्यीकरण म्हणजे केवळ रंगरंगोटी नाही, तर नागरिकांसाठी सुसज्ज आणि अभिमानास्पद सार्वजनिक जागा निर्माण करणं ही आमची जबाबदारी आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
आयुक्त चांडक यांनी स्पष्ट निर्देश दिले की, सर्व कामे ठरलेल्या वेळेत पूर्ण व्हावीत, कामांमध्ये कोणतीही ढिलाई खपवून घेतली जाणार नाही, अपूर्ण कामांमुळे अपघात होऊ नयेत, यासाठी योग्य सुरक्षाव्यवस्था ठेवावी, प्रत्येक प्रकल्पस्थळी माहिती फलक लावून पारदर्शकता राखावी, परिसरात सतत स्वच्छता राखावी, कचरा व माती हटवावी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांच्या परिसराचा विशेष दर्जाने विकास करावा. या दौर्‍यात उपायुक्त नरेंद्र वानखडे, शहर अभियंता रविंद्र पवार, डॉ. अजय जाधव, धनंजय शिंदे, सुहास चव्हाण, श्रीरंग तायडे, अजय विंचुरकर, मंगेश कडू, राजेश आगरकर, विजय बुरे, शारदा गुल्हाणे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
-नागरिकांना आवाहन
अमरावती हे आपले घर आहे. त्यामुळे शहर स्वच्छ व सुंदर ठेवणे आपलीही जबाबदारी आहे. वृक्षसंवर्धन, स्वच्छता आणि विकास प्रकल्पात नागरिकांनी सक्रिय सहभाग द्यावा. प्रशासन आणि जनतेमधील समन्वयाचाच विकासाचा पाया आहे, असे आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आवाहन करताना सांगितले.

संबंधित बातम्या

Back to top button