बच्चू कडूंच्या लढ्याला राज ठाकरेंचे पाठबळ
मनसे नेते बाळा नांदगावकर पदयात्रेत सहभागी होणार

-आता घोषणा नको, कृती हवी
-बच्चू कडूंनी सरकारला ठणकावलं
-भरपावसात पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
अमरावती / 9 जुलै: मराठी भाषेच्या लढ्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी काढलेल्या ‘सातबारा कोरा यात्रे’ला पाठिंबा जाहीर केला असून मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे गुरूवारी 10 जुलै रोजी यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील लालखिंड येथे बच्चू कडू यांच्या पदयात्रेत सहभागी होणार आहेत. बाळा नांदगावकर हे पदयात्रेत प्रत्यक्ष सहभागी होऊन शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी काढण्यात आलेल्या यात्रेला पाठिंबा दर्शविणार आहेत, अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षातर्फे देण्यात आली आहे.
देशाचे माजी कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पापळ येथून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली ‘7/12 कोरा कोरा कोरा’ यात्रेला गेल्या 7 जुलै पासून सुरुवात झाली. सुमारे 138 किमीच्या या यात्रेत शेतकरी, विविध पक्षातील कार्यकर्ते सरकारने सातबारा कोरा केलाच पाहिजे, अशी मागणी करीत मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. भरपावात शेकडो शेतकरी बच्चू कडू यांच्यासह या पदयात्रेत चालत आहेत. गावोगावी सभा घेउन बच्चू कडू शेतकर्यांशी प्रत्यक्ष संवादही साधत आहेत. 14 जुलै रोजी चिलगव्हाण येथे या यात्रेची जाहीर सांगता सभा होणार आहे. 14 जुलैला अंभोर्यात होणार्या सभेसाठी तुम्ही रिकाम्या हाताने नाही, तर रूमने आणि लाठ्या-काठ्या घेऊनच या असा थेट इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
दारव्हा तालुक्यातील तळेगाव येथे आयोजित सभेत बच्चू कडू यांनी सत्ताधार्यांना ठणकावले. ते म्हणाले, आता घोषणा पुरेशा नाहीत, आता कृती हवी. सरकारला वठणीवर आणायचं असेल, तर रस्त्यावर उतराव लागेल, तेही निर्धाराने आणि ताकदीने. वसंतराव नाईक हे केवळ मुख्यमंत्री नव्हते, तर खर्या अर्थाने शेतकर्यांचे देव होते. त्यांनी जेव्हा रोजगार हमी योजनेची कल्पना दिली, तेव्हा लाखो गरिबांना पोटभर अन्न मिळाले. आज तेच सरकार त्यांच्या वारशाचा अपमान करत आहे.
ते पुढे म्हणाले की, शेतकर्यांचे पाणी बंद, वीज बंद, अनुदान थांबले, विमा कंपन्यांच्या लुटीला संरक्षण हे सहन करायचे असेल तर आपण मृत समजून घ्यावे. पण आम्ही शेतकर्यांनी जगायचे ठरवले आहे. झुंजून, लढून आणि सरकारला गुडघ्यावर आणूनच ही पदयात्रा थांबेल, असेही ते म्हणाले. आज सकाळी 9 वाजता दारव्हा येथून या पदयात्रेला सुरुवात झाली होती.
आजीबाई… बच्चू कडू तुला घर बांधून देईन
आज यात्रेच्या दुसर्या दिवशी लोही बाजार गावातून जात असताना एक आजीबाई बच्चू कडू यांना पडक्या घरात बसलेली दिसून आली. तेव्हा बच्चू कडू यांनी त्या आजीबाईंशी चर्चा केली. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. तेव्हा आजींना राहायला पक्के घर नसून पडक्या घरात त्या राहत असल्याचे सांगितले. यानंतर क्षणाचाही विलंब न लावता बच्चू कडू यांनी त्या आजीबाईला ‘आजीबाई काळजी करू नका, जोपर्यत बच्चू भाऊ जिवंत आहे, तोपर्यंत तुम्हाला काहीही होणार नाही, बच्चू कडू तुम्हाला घर बांधून देईल’अशा शब्दात आश्वस्त केले.





