गवळीपुर्‍यात छापा, 6 तलवारी व 11 चाकू जप्त

दोन आरोपी गजाआड

-गुन्हे शाखेची कारवाई
अमरावती / 8 जुलै: पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या निर्देशावरुन शहर पोलिसांनी सध्या अवैध धंदे व घडामोडींना आळा घालण्यासाठी कंबर कसली असून कारवाईंचा धडका सुरु आहे. अशातच आज गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने गवळीपूरा येथे एका घरावर छापा मारुन मोठ्या प्रमाणात प्राणघातक शस्त्रे जप्त केली. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे.
गवळीपूरा येथील रहिवासी असलेल्या शेख रहिम उर्फ उंगा याच्या घरी गुन्हे शाखेने ही कारवाई केली. पोलिस निरिक्षक संदीप चव्हाण आणि एपीआय महेश इंगळे यांच्या नेतृत्वातील पथकाला शेख रहिम याच्या घरात मोठ्या प्रमाणात प्राणघातक शस्त्रांचा साठा असल्याची माहिती गोपनिय सूत्रांकडून मिळाली होती. त्यानंतर या पथकाने शेख रहिमच्या घरी धडक दिली. येथे पोलिसांना 6 तलवारी, 11 चाकू आणि एक कोयता असा शस्त्रसाठा आढळून आला. पोलिसांनी शेख रहिम आणि गुलवेज अहमद नूर अहमद (रा. जुनीवस्ती, बडनेरा) या दोघांना अटक केली. तर शेख जमीर उर्फ बाबा शेख आमद हा पोलिसांना गुंगारा देउन पसार होण्यात यशस्वी ठरला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
एकाच घरात एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्र आढळून आल्याने पोलिसही अवाक झाले आहेत. परिसरातही या कारवाईमुळे खळबळ उडाली होती. एवढा मोठा शस्त्रसाठा आरोपींनी कोणत्या हेतूने जमा केला होता, याबाबबत पोलिस चौकशी करित आहेत. उल्लेखनीय आहे की, कालच अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी अमरावती शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा विषय विधानसभेत पावसाळी अधिवेशनादरम्यान उचलला होता. त्यांनी शस्त्रांच्या धाकावर दहशत पसरविणार्‍या गुंडांमुळे शहराची कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली असल्याकडेही लक्ष वेधले होते. त्यानंतर शहरात गुन्ह्यांसाठी शस्त्र उपलब्ध करुन देणारे गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर आल्याचे दिसून येत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button