ओला दुष्काळ जाहीर करून दिवाळीपूर्वी मदत द्या
नवनित राणांचे मुंबई ते दिल्लीपर्यंत साकडे

-बांधावरुनच कृषीमंत्र्यांशी संपर्क
-सरसकट पंचनामे व दिवाळीपूर्वी मदतीची मागणी
अमरावती / 28 सप्टेंबर : जिल्ह्यात मागील महिनाभर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकर्यांचे पीक उद्ध्वस्त झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. ही संकटग्रस्त अवस्था प्रत्यक्ष पाहण्यासाठी भाजप नेत्या, माजी खासदार व स्टार प्रचारक नवनित रवी राणा यांनी दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्यातील गावागावांत जाऊन शेतकर्यांच्या शिवारातील पिकांची पाहणी केली.
अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीन, ज्वारी तसेच संत्री या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकर्यांनी खर्च करून पेरणी केली होती, मात्र निसर्गाने अवकाळी व अतिवृष्टीचा घात करून दिवाळीपूर्वीचा आनंद हिसकावून घेतला. या गंभीर परिस्थितीवर उपाययोजना तात्काळ व्हाव्यात यासाठी नवनित राणा यांनी शेतकर्यांच्या बांधावरूनच राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे व जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ घोषित करण्याची, सरसकट पंचनामे करण्याची आणि शेतकर्यांना दिवाळीपूर्वीच जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी केली.
शेतकर्यांना या संकटाला तोंड देता यावे, याकरिता केंद्र व राज्य शासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अशी विनंती नवनित राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली. नवनित राणा यांनी दर्यापूर तालुक्यातील आमला, थिलोरी, माऊली, खल्लार, कोकर्डा, लेहगाव, सामदा, सांगळुद, सासन, सागंवा, चिचोंली, चिचोंरी रहिमापुर तर अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सातेगाव, गावंडगाव, काळगव्हाण, हिंगणी, चिचोली, टाकरखेड, धनेगाव, पांढरी, कापूस तळणी, हंतोडा, विहीगाव, दहीगाव रेचा, लखाळ, भंडारज, कोकर्डा या गावांना भेटी देवून थेट शेतशिवारात जावून शेतकर्यांशी संपर्क साधला. यावेळी अजय देशमुख, अमोल कोरडे, किरण श्रीराव, चेतन ठाकरे, मदन बायस्कार, रवि ढोकणे, रवि ठाकुर, विठ्ठल ढोले, अशोक श्रीराव यांच्यासह स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




