शकुंतलेसाठी निधी द्या-खासदारांची रेल्वेमंत्र्याकडे मागणी

खा. बळवंत वानखडे यांनी मांडला विदर्भाचा प्रलंबित प्रश्न

अमरावती / 19 मार्च – केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 अंतर्गत रेल्वे मंत्रालयाच्या अनुदानावरील चर्चेदरम्यान, अमरावती लोकसभा क्षेत्राचे खासदार बळवंत वानखडे यांनी विदर्भा तील अत्यंत महत्त्वाची आणि दीर्घकाळापासून प्रलंबित अस लेल्या ’शकुंतला रेल्वे’ प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाचा मुद्दा संसदेत अत्यंत प्रभावीपणे मांडला. खा. वानखडे म्हणाले की, मूर्तीजापूर ते अचलपूर ही ऐतिहासिक रेल्वे वाहिनी केवळ दळणवळणाचे साधन नसून ती या भागातील शेतकरी, मजूर आणि सामान्य नागरिकांची जीवनवाहिनी आहे. ही सेवा गेल्या अनेक वर्षांपासून बंद असल्याने स्थानिक जनतेला मोठ्या हालअपेष्टांना सामोरे जावे लागत आहे. या रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय होऊन आणि सविस्तर प्रकल्प अहवाल तयार असूनही कामाला विलंब का होत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच रेल्वेमंत्र्यांनी या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करून काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली. शकुंतला रेल्वे पुन्हा सुरू झाल्यामुळे विदर्भाच्या स्थानिक विकासाला गती मिळेल आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. सरकारने जनभावनांचा सन्मान करून या प्रकल्पाला प्राधान्य द्यावे, अशी कळकळीची विनंतीही त्यांनी केली. जनतेच्या गरजांशी खेळू नका, तर शकुंतला रेल्वेला नवजीवन द्या, असा इशारा देत त्यांनी आपला संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
शकुंतला रेल्वेचे महत्त्व -शकुंतला रेल्वे ही ब्रिटिशकालीन ऐतिहासिक ओळख असून ती अमरावती आणि अकोला जिल्ह्यांना जोडते. ही रेल्वे सुरू झाल्यास कापूस उत्पादक शेतकर्‍यांना आणि ग्रामीण मजुरांना स्वस्त वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होईल, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button