50 लाखांची मागणी करत मृतदेह रस्त्यावर ठेऊन आंदोलन!

आश्रमशाळेतील विद्यार्थीनीचे मृत्यु प्रकरण तापले

-पटेल पिता-पुत्रासह आठ जणांवर गुन्हा
-घटांग-रोरा फाट्यावर संघर्ष आणि तणाव
-मुलीचा अंत्यविधी पोलीस बंदोबस्तात
अमरावती / 31 जुलै : चिखलदरा तालुक्यातील वसंतराव नाईक आदिवासी आश्रमशाळा, नागापूर येथे भिंत कोसळून एका 14 वर्षांच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे प्रकरण चांगलेच तापले आहे. आज मृतक सुमरती जामुनकर हिचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह घेऊन आंदोलन छेडण्यात आलं. तसेच प्रकल्प अधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्याचा प्रयत्न करत, रस्ता अडवून मृतदेह रस्त्यावर ठेवल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. माजी आमदार राजकुमार पटेल आणि त्यांचे पुत्र रोहित पटेल यांचा या आंदोलनात पुढाकार होता. याप्रकरणी पटेल पिता-पुत्रासह आंदोलनकर्त्यांविरोधात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून, रोहित पटेल यांना अटक करण्यात आली आहे.
दिनांक 29 जुलै रोजी आश्रमशाळेच्या आवारात असलेल्या पाण्याच्या टाकीची भिंत अचानक कोसळून एक विद्यार्थिनी मृत्युमुखी पडली. इतर तीन विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या. दुसर्‍या दिवशी मृतदेह अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. मात्र, गावाकडे गंगारखेडा येथे अंत्यसंस्कारासाठी नेण्याऐवजी, प्रकल्प अधिकारी, धारणी यांच्या कार्यालयात नेऊन तिथेच प्रेत ठेवून आंदोलन करणार, अशी भूमिका राजकुमार पटेल आणि रोहित पटेल यांनी घेतली. त्यांची ठाम मागणी होती की, जोपर्यंत 50 लाख रुपयांची मदत मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह हलणार नाही!
या आंदोलनामुळे धारणी येथे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता चिखलदरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार आणि पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शांततेचे आवाहन करून समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलक कोणत्याही परिस्थितीत मागे हटण्यास तयार नव्हते. यानंतर आंदोलनकर्त्यांनी घटांग टी पॉइंट येथे मृतदेह रस्त्यावर ठेवून रस्ता रोको केला. सुमारे 350 आंदोलनकर्त्यांनी सार्वजनिक वाहतुकीचा रस्ता अडवला. पोलिसांनी वारंवार विनंती केली की, मृतदेहाची अवहेलना करू नये, अंत्यविधीसाठी गावी नेण्यात यावा, पण आंदोलक थेट हुज्जतीवर उतरले.
मृतदेह नेत असताना पोलिसांनी रोरा फाट्याजवळ गाडी अडविली व शांततेचे आवाहन करत अंत्यविधीसाठी प्रेत गावी नेण्यास सांगितले. पण आंदोलक तिथेही हटले नाहीत. त्यामुळे अखेर पोलिसांनी राजकुमार पटेल व रोहित पटेल यांना ताब्यात घेऊन चिखलदरा पोलीस ठाण्यात आणलं. मृतदेह पुन्हा कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आणि गंगारखेडा येथे पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार पार पडले. या आंदोलनात सहभागी असलेल्या राजकुमार पटेल, रोहित पटेल, मन्ना दारसिंबे, सुनील उईके, रघुवीर सतवासे, गणेश बेटेकर, देविदास कोगे आणि 350 ते 400 आंदोलनकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न, रस्ता अडवणे, मृतदेहाची विटंबना, सरकारी कामात अडथळा, वाहतुकीला अडथळा अशा अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल झाला असून, रोहित राजकुमार पटेल याला अटक करण्यात आली आहे. राजकुमार पटेल यांना अटक झाल्यानंतर माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, राहुल येवले व काँग्रेसचे अन्य पदाधिकारी तसेच प्रहार संघटनेचे कार्यकर्ते चिखलदरा पोलीस ठाण्यावर धडकले. त्यांनी आंदोलनास समर्थन दिले.

-पोलिसांवर गाडी घालण्याचा प्रयत्न
रास्ता रोकोनंतर काही वेळातच राजकुमार पटेल व त्यांच्या सहकार्‍यांनी प्रेत चारचाकी वाहनात ठेवून धारणीच्या दिशेने प्रस्थान केलं. पोलिसांनी आरसीपी पथकाच्या मदतीने वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता, रोहित पटेल यांनी थेट पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला! पोलिसांनी उड्या मारून आपला जीव वाचवला.

-रोहित पटेलला न्यायालयीन कोठडी, तरुंगात रवानगी
चिखलदरा पोलिसांनी आज दुपारी रोहित पटेलला अचलपूर न्यायालयात हजर केले, न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रस्ता अडवणे आणि पोलिसांवर वाहन घालण्याचा प्रयत्न करणे, अशा गंभीर आरोपांवरून रोहित पटेलांवर ही कारवाई करण्यात आली आहे. राजकुमार पटेल यांच्यावरही याप्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मात्र प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आल्याचे समजते.

संबंधित बातम्या

Back to top button