अमरावतीत वाढत्या गुन्हेगारीविरोधात धरणे आंदोलन

सीसीटीव्ही कॅमेरे, तीन नव्या पोलिस ठाण्यांची मागणी

अमरावती / 21 सप्टेंबर : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारी घटनांवर आळा बसावा या मागणीसाठी आज अमरावतीत नागरिकांनी पोलिस आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व किरण मधुकर गुडधे यांनी केले. आंदोलनकर्त्यांची ठाम मागणी आहे की, शहरात सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे जाळे उभारावे तसेच तीन नवे पोलिस ठाणे स्थापन करावे, ज्यामुळे गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवणे पोलिसांसाठी सुलभ होईल.
नागरिकांनी सांगितले की, सन 2018 पासून या विषयावर अनेकदा निवेदनं व पत्रव्यवहार करण्यात आला, मात्र शासन वा पोलिस प्रशासनाने अद्याप ठोस पावले उचललेली नाहीत. परिणामी हत्या, लूट, दरोडे, बलात्कार, छेडछाड आणि चोरीसारख्या घटनांत लक्षणीय वाढ झाली आहे. अलीकडेच शहरात झालेल्या गोळीबाराच्या घटना, अल्पवयीनांनी सुपारी घेऊन खून केल्यासारखे भयानक प्रकार घडले आहेत, यातून नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आंदोलनकर्त्यांचा दावा आहे की, नव्या सरकारच्या स्थापनेनंतर गत पाच महिन्यांत राज्यभर तब्बल 1 लाख 60 हजार गुन्हे नोंदवले गेले आहेत. हे चित्र चिंताजनक असून अमरावतीसारख्या शहरात गुन्हे रोखण्यासाठी ठोस पावले घेण्याची गरज असल्याचा नागरिकांचा सूर होता. सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेले व नवीन पोलिस ठाणे कार्यरत झाले तर सध्याच्या पोलिस दलावरील कामाचा ताण कमी होऊन सुरक्षा व्यवस्था अधिक परिणामकारक होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. प्रदर्शनकर्त्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर तातडीने मागण्यांवर निर्णय घेऊन ठोस अंमलबजावणी केली नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल.

संबंधित बातम्या

Back to top button