अमरावतीत मसाज सेंटरच्या आडोशाने वेश्या व्यवसाय
नेस्क्ट लेवल मॉलमधील गोरखधंदा

-‘स्पा 99’ वर पोलिसांचा छापा
-मॅनेजरसह काही तरुणींना घेतले ताब्यात
-आक्षेपार्ह वस्तू व 1.14 लाखांचा मुद्देमाल जप्त
अमरावती / 2 जुलै: अमरावतीसारख्या सुसंस्कृत शहरात वैध व्यवसायाच्या नावाखाली अनधिकृत धंदे चालविले जात असल्याचे अनेक प्रकार गेल्या काही वर्षांत उघडकीस आले आहे. आता मसाज सेंटरच्या आडोशाने सुरु असलेला वेश्या व्यवसायाचा गोरखधंदा अमरावती पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट – 2 च्या पथकाने उघडकीस आणला आहे. गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गर्ल्स हायस्कुल चौकात असलेल्या नेक्स्ट लेवल मॉलमध्ये ‘स्पा 99’ या थेरपी सेंटरमध्ये हे अनैतिक कृत्य सुरु होते. या सेंटरवर छापा मारुन गुन्हे शाखेने येथील व्यवस्थापकासह काही तरुणींना ताब्यात घेतले आहे. येथून आक्षेपार्ह साहित्यासह 1.14 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्पा सेंटरचा मालक मध्य प्रदेशातील रहिवासी आहे, त्याच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी नूकतीच गुन्हे शाखेची विशेष बैठक घेउन शहरातील अवैध व्यवसायांचा पर्दाफाश करण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखा अवैध व्यवसायांवर पाळत ठेवून आहे. दरम्यान गर्ल्स हायस्कुल चौकातील नेक्स्ट लेवल मॉलमध्ये असलेल्या स्पा 99 या सेंटरबाबत माहिती गुन्हे शाखा युनिट – 2 ला गुप्त सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली. येथे मसाज थेरपीच्या नावाखाली शरीर विक्रीचा व्यवसाय केला जातो, असे समजले. त्यानंतर गुन्हे शाखेने शहानिशा करण्यासाठी आपला हेर या सेंटरमध्ये पाठविला. मिळालेल्या माहितीमध्ये तथ्थ्य आढळून आल्यानंतर हेराने गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक संदीप चव्हाण यांना त्याबाबत कळविले. तेव्हा गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने दोन पंचांसह स्पा 99 वर धडक देत छापा मारला. मॉलच्या पहिल्या माळ्यावर असलेल्या या सेंटरमध्ये मसान थेरपीच्या नावाखाली देह विक्री व्यवसाय सुरु असल्याचे आढळून आले.
गुन्हे शाखेने या सेंटरचा व्यवस्थापक निरजसिंग भवरसिंग पंड्या (35, रा. दस्तूर नगर, चैतन्य कॉलनी, अमरावती) याच्यासह काही तरुणींना ताब्यात घेतले. त्यांची गाडगेनगर पोलिस ठाण्यात चौकशी करण्यात येत आहे. व्यवस्थापक पंड्या याने या सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याचे कबुल केले. स्पा 99 मधून गुन्हे शाखेने काही आक्षेपार्ह वस्तू, मोबाईल व रोख रक्कम असा एकुण 1 लाख 14 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई गुन्हे शाखा युनिट 2 चे निरिक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलिस निरिक्षक महेश इंगोले, उपनिरिक्षक संजय वानखडे, एएसआय महेंद्र येवतीकर, हेकाँ गजानन ढेवले, दीपक सुंदरकर, मनोज ठोसर, आस्तिक देशमुख, माधुरी साबळे, संग्राम भोजने, मंगेश शिंदे, योगेश पवार, राजीक रायलीवाले, विशाल वाकपांजर, सागर ठाकरे, चेतन कराडे, वर्षा घोंगडे, संदीप खंडारे, राहुल दुधे यांनी केली.
-सेंटरचा मालक मध्य प्रदेशातील रहिवासी
नेक्स्ट मॉलमधील या स्पा 99 सेंटरच्या मालकाचे नाव राकेश रावल असे आहे. तो मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात असलेल्या जावरा येथील रहिवासी आहे. अमरावतीत त्याने भाड्याने जागा घेउन मसाजच्या नावाखाली हा वेश्या व्यवसाय थाटला होता. स्थानिक रहिवासी असलेला निरजसिंग पंड्या प्रत्यक्ष व्यवसाय सांभाळत होता. हे दुकान रहाटगाव, शिवाजी नगर येथील रहिवासी असलेल्या अभिजित दिलीप लोखंडे यांच्या मालकीचे आहे. त्याचा पोलिसांनी शोध घेतला पण तो सापडला नाही. या सर्वांवर गाडगेनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.




