प्रॉपर्टी व्यावसायिक मंगेश उताणे यांचा दुर्दैवी मृत्यू

अमरावती /24 नोव्हेंबर : शहरातील ओळखले जाणारे प्रॉपर्टी व्यावसायिक मंगेश गंगाधर उताणे (वय 42,) रा. गणेश रेसिडेन्सी, चेतन्य कॉलनी यांचा रेल्वे स्टेशन परिसरातील नालीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारच्या सकाळी समोर आली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. माहितीनुसार, मंगेश उताणे हे नेहमीप्रमाणे रविवार रात्री उशिरा स्टेशन परिसरात थांबण्यासाठी गेले होते. रेल्वे पुलाजवळील नालीच्या कडेला बसले असताना अचानक तोल जाऊन ते नालीत कोसळले असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे. दुखापतीमुळे ते बेशुद्ध अवस्थेतच नालीत पडून राहिले. आज सकाळी वाहन पार्किंग कर्मचारी हे क्षेत्राची पाहणी करत असताना मंगेश उताणे यांना नालीत पडलेल्या अवस्थेत आढळले. तत्काळ रेल्वे पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रेल्वे पोलिसांनी घटनास्थळावरील सिसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यामध्ये मंगेश उताणे हे एकटेच तेथे येऊन बसल्याचे दिसून आले आहे. तरीही हा मृत्यू अपघाती असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. पुढील तपास रेल्वे पोलीस निरीक्षक अमोल दौण्ड यांच्या मार्गदर्शनात तपासी अंमलदार पो.हेड.कॉ. प्रदीप घोडकर व गजानन टाले हे करीत आहे. मंगेश उताणे यांच्या अकस्मात निधनाने व्यावसायिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या मागे वडील, पत्नी, मुलगी, भाऊ व बहीण असा आप्त परिवार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button